चोरीचा मामला ! कल्याण-बदलापुरात बसून चोरट्यांची अनोखी शक्कल, कराड पोलीसही चक्रावले

चोरटे चोरीसाठी काय शक्कल लढवतील याचा काहीच भरोसा नाही. घरफोड्या, मोबाईल, चैन स्नॅचिंग सारख्या अनेक घटना आपण ऐकून आहोत. पण आता ऑनलाईन पद्धतीने चोरी करण्यातही चोर चांगलेच हुशार झाले आहेत.

चोरीचा मामला ! कल्याण-बदलापुरात बसून चोरट्यांची अनोखी शक्कल, कराड पोलीसही चक्रावले
प्रातिनिधीक छायाचित्र

सातारा : चोरटे चोरीसाठी काय शक्कल लढवतील याचा काहीच भरोसा नाही. घरफोड्या, मोबाईल, चैन स्नॅचिंग सारख्या अनेक घटना आपण ऐकून आहोत. पण आता ऑनलाईन पद्धतीने चोरी करण्यातही चोर चांगलेच हुशार झाले आहेत. विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यातील कल्याण, बदलापूर सारख्या शहरांमध्ये राहून थेट सातारा जिल्ह्यात ऑनलाईन वस्तू मागवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी जेरबंद केलं आहे. चोरांची ही शक्कल जेव्हा पोलिसांना कळाली तेव्हा पोलीस देखील चक्रावून गेले.

नेमकं प्रकरण काय?

कराड शहरात ऑनलाईनद्वारे मोबाईल मागवून कुरिअर देणाऱ्याची हातचालाखीने फसवणूक करून मोबाईल चोरणाऱ्याचे प्रमाण वाढले होते. त्या चोरांना पकडण्याचे कराड पोलीसांसमोर आव्हान होते. त्यांनी तांत्रिक माहितीचा अभ्यास करून विविध तपास कौशल्यांचा वापर केला. दरम्यान कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेतील कर्मचाऱ्यांनी संशयीतांचा शोध घेतला. अटक केलेल्या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपींनी नेमके गुन्हे कसे केले?

संबंधित घटना ही सातारा जिल्ह्यातील कराड शहरात घडली आहे. आरोपी हे ऑनलाईन पद्धतीने मोबाईल मागवायचे. ऑनलाईन मोबाईल ठराविक पत्त्यावर आल्यानंतर ते डिलिव्हरी बॉयला अर्धे सुट्टे पैसे द्यायचे. त्यातून ते डिलिव्हरी बॉयला पैसे मोजण्यात गुंतवायचे. या दरम्यान ते डिलिव्हरी बॉयकडून मोबाईल घेऊन मोबाईलचा बॉक्स उघडायचे. त्यामधून ते मोबाईल काढायचे आणि त्याठिकाणी मोठ्या चालाखीने साबण ठेवायचे. नंतर बॉक्समध्ये साबणच असल्याचं म्हणत आपली फसवणूक झाल्याचा आरडाओरड करायचे. तसेच आता एवढेच पैसे आहेत, असे सांगून डिलिव्हरी बॉयला परत पाठवायचे. अशा घटना वारंवार समोर येत होत्या.

पोलिसांनी आरोपींना बेड्या कशा ठोकल्या?

ऑनलाईन पद्धतीने अशाप्रकारे चोरी होण्याच्या घटना शहरात वाढल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणातील चोरांना बेड्या ठोकण्याचं कराड पोलिसांपुढे मोठं आव्हान होतं. पोलिसांनी तांत्रिक माहितीचा अभ्यास करुन विविध तपास कौशल्यांचा वापर केला. त्यातून त्यांना आरोपी हे ठाणे जिल्ह्यातील कल्याण, बदलापूर शहरातील असल्याचं माहिती पडलं. त्यानंतर कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेतील कर्मचाऱ्यांनी संशयितांचा शोध घेतला. त्यानंतर त्यांनी कल्याण, बदलापूरमधून आरोपींना बेड्या ठोकल्या. आरोपींची चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा देखील कबूल केला. आरोपीने एकूण 1 लाख 69 हजार 967 रुपयांची फसवणूक केली होती.

आरोपींकडून पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत

रॉबिन अँथोनी आरोजा (वय 26), किरण अमृत बनसोडे (वय 24), राहूल मच्छिंद्र राठोड (वय 21) रॉकी दिनेश कर्णे (वय 21), गणेश ब्रम्हदेव तिवारी (वय 39) असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून 2 कार, 1 लॅपटॉप, 8 मोबाईल, 14 वेगवेगळी आधारकार्ड आणि फसवणूकीकरता वापरण्यात येणारे साहित्य तसेच 5 लाख 26 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजीत बोऱ्हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील व कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर यांनी केलेली आहे.

हेही वाचा :

पाकीट पळवणाऱ्या चोरट्याचा पाठलाग महागात, विरारमध्ये 30 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या

प्रेयसीच्या आत्महत्येने संताप, प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या तरुणाची प्रियकराकडून हत्या

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI