पित्याने ज्या मुलीवर अंत्यसंस्कार केले, ती परत घरी आली..मग जिच्यावर अंत्यसंस्कार झाले ती कोण?
मुलीचे अपहरण होते आणि तिचा मृतदेह एक्सप्रेसवेच्या खाली सापडतो. त्यानंतर पिता लाडक्या मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करतो आणि तिच मुलगी काही दिवसांनी घरी चालत येते. या विचित्र घटनेने पालक आणि पोलीस देखील गोंधळले आहेत.

एक चमत्कारीक घटना घडली आहे. एका तरुणीच्या अपहरणातून हत्या केल्याच्या प्रकरणात पित्याच्या तक्रारीवरुन आरोपींना अटक झाली. त्यानंतर जिच्यावर मुलगी समजून पित्याने अंत्यसंस्कार केले तिच मुलगी घरी चालत आली. आपली मुलगी जिवंत परत आल्याने घरच्यांना आनंद झाला. परंतू जिला आपली मुलगी समजून अंत्यसंस्कार केले ती नेमकी कोण या प्रश्नाने पोलीस आणि मुलीचे पालकही चिंतेत सापडले आहेत.
कहाणी नेमकी काय ?
बुंदेलखंड एक्सप्रेसवे हमीरपुर जिल्ह्यातील जरिया भागातून जातो. एक आठवड्यांपूर्वी याच एक्सप्रेसवेच्या खाली एका मुलीचा मृतदेह सापडला होता. पोलिसांना यासंदर्भात स्थानिकांनी तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी या मुलीचे वर्णन आजूबाजूच्या पोलिसांना पाठवले. त्यानंतर मुस्कुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बिहुनी गावातील रहिवासी मलखान प्रजापती पुढे आले. त्यांनी या मृतदेहाची ओळख पटवून ती त्यांची मुलगी शिवानी प्रजापती असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करुन हा मृतदेह पालकांना सोपवला.
मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल
मलखान यांनी मुलगी शिवानी प्रजापती हीचा अंत्यसंस्कार केला. तसेच त्यांच्या गावातील तरुण मनोज अनुरागी आणि त्याचे वडील महेश अनुरागी यांच्यावर मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला. केस दाखल झाल्यानंतर आरोपींचा शोध सुरु झाला. पोलिस कामाला लागले.तेव्हा शिवानी जीवंत असल्याची बातमी कळाली. त्यानंतर १७ वर्षीय शिवानी हिला जालौन येथील गोहांड परिसरातून शिवानी हीला ताब्यात घेण्यात आले. शिवानी सापडताच गावात हाहाकार उडाला. कारण जिचा अंत्यसंस्कार वडिलांनी केले ती नेमकी कोण याचा प्रश्न सगळ्यांनाच पडला.
मृत शिवानी कशी जीवंत ?
पोलीस अधिकारी मयंक चंदेल यांनी सांगितले की तिच्या मृतदेहाची ओळख तर तिच्या तित्याने केली आहे. त्याच आधारे पोलिसांनी हा मृतदेह त्यांच्या हवाली केला होता. आणि मुलीच्या पित्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि आरोपींचा शोध सुरु केला. प्रकरण पुढे गेले तेव्हा शिवानी जीवंत असल्याचे कळाल्याने पोलिसांनी शिवानी शोधून तिच्या घरी सुखरुप पाठवले. परंतू आता हायवेवर मिळालेला मृतदेह नेमका कोणाचा ? ही चूक पालकांची असल्याचे पोलिस म्हणत आहेत.
मृत युवती कोण ?
एक्सप्रेसवेच्या जवळ मिळालेल्या मृत तरुणीचे वय २५ वर्षे असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलीसांनी संशय आहे की ही तरुणी दुसऱ्या जिल्ह्यातील असणार आहे. आता पोलिस तपास करीत आहेत. आणि पुरावे जमा करीत आहे. पोलिसांना या घटनेबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलीस देखील या प्रश्नाचे उत्तर शोधत आहेत.
