Explain : पोलीस दलात DGP राहिलेल्या नवऱ्याचा बायकोनेच खून का केला? मर्डर केसची Inside Story
पोलीस दलात डीजीपी सारख्या इतक्या उच्च पदावर राहिलेल्या व्यक्तीची पत्नीनेच हत्या केल्याने खळबळ उडणं स्वाभाविक आहे. ही हत्या का केली? त्यामागची काय कारणं आहेत?. महत्त्वाच म्हणजे या जोडप्याला वयात आलेली दोन मुलं आहेत, एक मुलगा आणि मुलगी. पतीची हत्या केल्यानंतर पत्नी IPS च्या फॅमिली ग्रुपवर काय म्हणाली? जाणून घ्या हायप्रोफाइल मर्डर केसचे सर्व डिटेल्स

कर्नाटकचे माजी डीजीपी ओमप्रकाश यांच्या हत्येने सगळ्या देशात खळबळ उडाली आहे. महत्त्वाच म्हणजे या प्रकरणात मारेकरी, प्रमुख संशयित पत्नीच आहे. ही बातमी पाहिल्यानंतर किंवा वाचल्यानंतर प्रत्येकजण हाच विचार करतोय की, एक पत्नीने असं का केलं? कुठल्या परिस्थितीत तिने हे पाऊल उचललं?. पत्नीने पतीची इतकी निर्घृण हत्या का केली? डीजीपीला संपवणारी त्याची पत्नी, त्याशिवाय दोन्ही मुलं मुलगी आणि मुलाने पोलीस चौकशीत माहिती दिली आहे. पण काही गोष्टी अशा सुद्धा आहेत, ज्या अजून रेकॉर्डवर आलेल्या नाहीत. खरतर याच गोष्टींमध्ये हत्येच खरं कारण दडलं आहे. या हादरवून सोडणाऱ्या प्रकरणातील इनसाइड डिटेल्स समजून घेऊया.
सर्वप्रथम हे समजून घ्या, माजी डीजीपी ओमप्रकाश यांची हत्या कशी झाली? बंगळुरु पोलिसांनुसार, शनिवारी माजी डीजीपी ओमप्रकाश आणि त्यांच्या पत्नींमध्ये भांडण झालं होतं. त्यानंतर ओमप्रकाश आपल्या कारमध्ये बसले व बहिणीच्या घरी निघून गेले. त्यांच्या बहिणीचा सुद्धा घटस्फोट झालाय. ती एका खासगी कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. रविवारी दुपारी त्यांची मुलगी बहिणीच्या घरी आली. ओमप्रकाश यांची समजूत काढली व त्यांना पुन्हा आपल्या घरी घेऊन आली. घरी आल्यानंतर नवरा-बायकोमध्ये पुन्हा कडाक्याच भांडण झालं. त्यावेळी ओमप्रकाश यांच्यावर पत्नी पल्लवीने 8 ते 10 वेळा चाकू भोसकला. पल्लवीने ओमप्रकाश यांच्या छातीवर, पोटावर आणि हातावर वार केले.
‘मॉन्स्टरला कायमस्वरुपी संपवून टाकलं’
अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर ओमप्रकाश घरातच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. ते जवळपास 20 मिनिटं जमिनीवर तडफडत होते. पत्नी पल्लवी आणि मुलगी तिथेच होती. त्यांनी ओमप्रकाश यांना तडफडून प्राण सोडताना पाहिलं. ओमप्रकाश यांच्या शरीराची हालचाल थांबल्यानंतर पल्ल्वीने एचएसआर लेआऊट पोलीस स्टेशनला फोन करुन घटनेची माहिती दिली. त्याआधी पल्लवीने दुसऱ्या माजी डीजीपीच्या पत्नीला व्हिडिओ कॉल करुन ‘मॉन्स्टरला कायमस्वरुपी संपवून टाकलं’ असं सांगितलं. त्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी पत्नी आणि मुलीला ताब्यात घेतलं. चौकशीनंतर रविवारी दोघींना अटक केली.
आयपीएसच्या फॅमिली व्हॉट्स App ग्रुपवर काय उत्तर दिलं?
मूळचे बिहार चंपारणचे असलेले माजी डीजीपी ओमप्रकाश यांनी बंगळुरुमध्ये भरपूर संपत्ती बनवलेली. डीजीपी असताना त्यांनी काली नदीच्या किनाऱ्यावर तीन एकरपेक्षा अधिक जमीन खरेदी करुन भव्य फार्म हाऊस बनवलं होतं. त्याशिवाय बरीच संपत्ती त्यांनी पत्नी आणि मुलीच्या नावावर केली होती. मग, प्रश्न निर्माण होतो, हत्या करण्याची वेळ का आली?. जिथे आपलेच वैरी बनले. त्याचं उत्तर पल्लवीने आयपीएसच्या फॅमिली व्हॉट्स App ग्रुपमध्ये दिलं.
या हत्येमागच अजून एक कारण संपत्ती का?
“पती मला आणि माझ्या मुलीला अपमानित करत आहेत. ते अनेकदा आमच्यावर बंदूत रोखतात व गोळी मारण्याची धमकी देतात” असं मेसेजमध्ये लिहिलं होतं. त्याशिवाय या हत्येमागे अजून एक कारण सांगितलं जातय ते डीजीपीच्या संपत्तीशी संबंधित आहे. पूर्व डीजीपी ओमप्रकाश यांचं दांडेली येथे एक फार्म होतं. ते फार्म त्यांनी बहिणीच्या नावावर केलं होतं. त्यानंतर घरात वादावादी सुरु झाली. त्याशिवाय ओमप्रकाश यांच्याकडे बंगळुरुत दोन घरं आहेत. एक फ्लॅट कावेरी जंक्शनवरील प्रेस्टीज अपार्टमेंटमध्ये आहे, जिथे त्यांची हत्या झाली.
मुलाचा धक्कादायक आरोप
पूर्व डीजीपीचा मुलगा कार्तिकेशने पोलिसांसमोर वेगळं स्टेटमेंट दिलं. त्याने आई पल्लवी व बहिण कृती विरोधात तक्रार दिली. मागच्या आठवड्याभरापासून आईने वडिल ओमप्रकाश यांचा छळ चालवला होता. त्यांनी जीवे मारण्याची धमकी देत होती. म्हणून वडिल राहत घर सोडून आत्या सरिताच्या घरी निघून गेले. त्यानंतर बहिण कृती तिथे गेली. ती वडिलांची समजूत घालून त्यांना घरी घेऊन आली.
वडिलांची हत्या झाली, तेव्हा मुलगा कुठे होता?
कार्तिकेशनुसार, तो 20 एप्रिलच्या संध्याकाळी डोम्लुर येथील कर्नाटक गोल्फ असोसिएशनच्या मैदानावर गेला होता. त्याच दरम्यान वडिलांची हत्या झाली. कार्तिकेशने सांगितलं की, शेजाऱ्यांचा फोन आल्यानंतर तो घरी निघून आला. घरी आल्यावर पाहिलं की, पोलीस आणि अन्य लोक जमलेले. वडिलांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला. मृतदेहाजवळ एक तुटलेली बॉटल आणि चाकू होता.
महिला आणि मुलींसोबत अनैतिक संबंध
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, माजी डीजीपी ओमप्रकाश हे अय्याशी करणारं व्यक्तीमत्व होतं. घरी पत्नी बरोबर भांडण व्हायची. म्हणून ते आपला बराचसा वेळ फार्म हाऊसवर घालवायचे. असं म्हटलं जातं की, या फार्म हाऊसवर हाय प्रोफाइल पार्ट्या चालायच्या. सभ्य समाजात वर्जित असलेल्या गोष्टी या पार्ट्यांमध्ये चालायच्या. स्वत: पल्लवीने सुद्घा व्हॉट्सअप चॅटमध्ये ही गोष्ट स्वीकारलेली. नवऱ्याचे अनेक महिला आणि मुलींसोबत अनैतिक संबंध असल्याच तिने सांगितलं होतं. पल्लवीने अनेकदा यावरुन नवऱ्याला टोकलं होतं.
हत्येच्यावेळी नेमकं काय घडलेलं?
मारेकरी पत्नी पल्लवीचा दावा आहे की, तिने स्वसंरक्षणासाठी ही हत्या केली. पोलिसांना दिलेल्या जबानीत पल्लवीने सांगितलं की, नवऱ्याने आपल्यावर बंदूक रोखली होती. ते गोळी चालवणार होते. म्हणून त्यांना बॉटल फेकून मारली. जेव्हा ते खाली पडले, तेव्हा चाकूचे सपासप वार करुन हत्या केली.
