बॅग घेऊन जात होती… पोलिसांनी रोखलं, बॅग तपासताच मिळाली अशी गोष्ट… बोबडीच वळली
दिल्ली पोलिसांनी गुन्हेगारी आणि गुन्हेगारांविरोधात मोहीम सुरू केली आहे. विशेषत: अंमली पदार्थ तस्करांवर कडक कारवाई केली जात आहे. याअंतर्गत पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

देशाची राजधानी दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे, तरीही सर्वाधिक गुन्हे हे दिल्लीमध्ये होताना दिसतात. राजधानीत गुन्हेगारीशी संबंधित धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. अशाच एका प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या पथकाने एका महिला तस्कराला अटक करून ड्रग सिंडिकेटचा पर्दाफाश केल्याचा दावा केला आहे. आरोपी महिला ड्रग्ज तस्कराकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थही जप्त करण्यात आले आहेत. ड्रग्ज सिंडिकेट ज्या प्रकारे काम करते ते पाहून पोलीसही चक्रावून गेले. सध्या या प्रकरणी चौकशी सुरु आहे.
दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी सोमवारी एका महिला ड्रग्ज तस्कराला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. संशयित महिलेच्या अटकेसोबतच आंतरराज्यीय अंमली पदार्थांच्या तस्करीच्या जाळ्याचाही पर्दाफाश केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आरोपी महिलेच्या बॅगेतून 512 ग्रॅम चरस आणि 1200 ग्रॅम गांजा पावडर (मोरक्कन) जप्त करण्यात आली आहे. खुल्या बाजारात त्याची किंमत बऱ्यापैकी असल्याचे सांगितले जाते. दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, संशयित ड्रग्स तस्कर महिलेला दक्षिण दिल्लीतील नेब सराय येथून अटक करण्यात आली आहे.
पतीला यापूर्वी झाली अटक




दिल्ली पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, विशेष पथकाने एका संशयीत महिलेला बॅग घेऊन जाताना पकडले. तिच्या बॅगची झडती घेतली असता त्यामधून अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. त्यानंतर महिलेला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान, आरोपी महिलेने उघड केले की, अशाच एका प्रकरणात तिच्या पतीला अटक झाल्यानंतर ती अंमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी झाली.
मुलगाही हा धंदा करतो
आरोपी महिलेने पोलिसांनी केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, त्यांचा मुलगा सध्या नेपाळ सीमेजवळ पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे राहतो. महिलेने पुढे सांगितले की, तिचा मुलगा कथितरित्या ड्रग्सचे नेटवर्क सांभाळत होता. तस्करीचा माल नेपाळमधून आणला जातो आणि ट्रेनने दिल्ली-एनसीआरपर्यंत पोहोचवला जातो. तेथे तो दिल्ली, गुरुग्राम आणि नोएडाच्या पॉश भागात 10 ग्रॅमच्या लहान पॅकेटमध्ये विकतो. या धंद्याशी संबंधीत माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली जाते. हे ड्रग्ज दिल्यानंतर त्या बदल्यात ऑनलाइन पेमेंट करण्यात येते.