‘तुझी बायको माझी गर्लफ्रेंड आहे…’ प्रियकराने नवऱ्याला सांगितले अन् झाला मोठा कांड
विवाहबाह्य संबंधांतून 4 जणांची हत्या झाल्याचे समोर आले आहे.सहा महिन्यांपूर्वी 30 वर्षीय महिलेचे आणि तिच्या तीन मुलांचे मृतदेह फासावर लटकलेले आढळले होते. आता या प्रकरणाचा खुलासा झाला आहे.

भारतात विवाहबाह्य संबंधांच्या घटना झपाट्याने वाढल्या आहेत. अशाच एक प्रकरणात 4 जणांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. बिहारमधील पूर्णिया येथील किलपाडा गावात एक महिला आणि तिच्या तीन मुलांचे मृतदेह आढळले होते. महिलेने मुलांना मारुन आत्महत्या केली असल्याचे सुरुवातीला वाटत होते. मात्र पोस्टमार्टमनंतर ही हत्या असल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सहा महिन्यांपूर्वी 30 वर्षीय बबिता कुमारी आणि तिच्या तीन मुलांचे मृतदेह फासावर लटकलेले आढळले होते. बबिताचा पती रवी शर्माने, ‘मी गावातील मंदिरात एका सभेला गेलो होतो, त्यावेळी पत्नी मला वारंवार फोन करुन बोलवत होती, त्यामुळे मी तिच्यावर ओरडलो होतो. पण मी जेव्हा घरी आलो तेव्हा मला पत्नी आणि मुलांचा मृतदेह आढळला’ असा दावा केला होता.
गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी रवीवर विश्वास ठेवला होता, कारण गावकऱ्यांनीही तो सभेला उपस्थित होता असं म्हटलं होतं. त्यानंतर पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे म्हणत ही केस बंद केली होती. मात्र पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण मिळाल आहे. रिपोर्टमध्ये महिलेची हत्या गळा दाबून करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला आहे.
चौकशीतून धक्कादायक वास्तव आले समोर
समोर आलेल्या माहितीनुसार, मृत बबिताचे गावातील निलेश कुमार या व्यक्तीशी प्रेमसंबंध होते. ती निलेशवर लग्नासाठी दबाव आणत होती. तसेच बबिता अनेकदा पतीला आपल्या मार्गातून हटवण्याबद्दल बोलत असायची. त्यामुळे निलेशने रवी शर्माला संपूर्ण प्रकरण सांगितले. तुझी बायको माझी गर्लफ्रेंड आहे असं त्याने सांगितले. यामुळे रवी आपल्या पत्नीचा द्वेष करू लागला.
यानंतर दोघांनी बबिताला ठार करण्याची योजणा आखली. दोघांनीही घरात घुसून झोपलेल्या बबिताचा गळा दाबून खून केला. मात्र तिची तीन मुले जागे झाली आणि ती रडू लागली, त्यामुळे दोघांनी त्यांचाही खून केला आणि नंतर सर्वांना फासावर लटकवले.
दुसऱ्या दिवशी रवीने नाटक रचले. तो मंदिरातील सभेला गेला, मात्र त्याने सतत फोन आल्याचे नाटक केले. त्यानंतर घरी परतल्यावर त्याने शेजाऱ्यांसमोर मोठ्याने रडण्याचे नाटक केले. मात्र सत्य समोर आल्यानंतर पोलिसांनी पती रवी शर्मा आणि प्रियकर निलेश कुमार दोघांनाही अटक केली आहे. आता त्यांनी कठोर शिक्षा होण्याची शक्यता आहे.
