विद्यापीठाच्या निर्णयाने विद्यार्थीनींना बसला धक्का, नागपूर विद्यापीठावर जोरदार टीका
जवळपास सर्वच विद्यापीठांकडून परीक्षा या घेतल्या जात आहेत. नागपूर विद्यापीठाकडून देखील परीक्षेचे आयोजन करण्यात आलंय. मात्र, नागपूर विद्यापीठाच्या एका निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा फटका बसल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर विद्यापीठ प्रशासनाकडून जोरदार टीका देखील केली जातंय.

सध्या तापमानात मोठी वाढ झालीये. यामध्ये अनेक विद्यापीठांकडून परीक्षांचे आयोजन करण्यात आलंय. भर उन्हाळ्यात नागपूर विद्यापीठाच्या एका निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा फटका बसलाय. हेच नाही तर भर उन्हात 20 ते 25 किलो मीटरचा प्रवास करून परीक्षा केंद्रांवर पोहचावे लागतंय. कित्येक किलो मीटर चालून त्यांना परीक्षा केंद्र गाठावे लागतंय. विद्यापीठाकडून ऐन परीक्षेच्या वेळी परीक्षा केंद्रात बदल केल्याने मोठा फटका बसल्याचे दिसतंय. हेच नाही तर आर्थिक भुर्दंड देखील विद्यार्थ्यांना बसतोय. अचानक परीक्षा केंद्रात बदल का केला? असा प्रश्न आता विद्यार्थीनींकडून उपस्थित केला जातोय.
गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील आदिवासी भागातील जी. के कला व विज्ञान महिला महाविद्यालय कावराबांध येथील विद्यार्थिनींना ऐन वेळी परीक्षा केंद्र बदलल्यामुळे पंधरा ते वीस किलोमीटर पायपीट करून परीक्षेसाठी सालेकसा येथे जावे लागत आहे. एक किलोमीटर अंतरावरील झालीया येथील नियमित परीक्षा केंद्र ऐन परीक्षेच्या तोंडावर बदलण्याचा अफलातून निर्णय विद्यापीठाने घेत विद्यार्थींनीना मोठा धक्का दिला.
या निर्णयावर व विद्यापीठाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत विद्यार्थीनींनी रोष व्यक्त केला आहे. विद्यापीठाने हा निर्णय मागे घेऊन पूर्वस्थिती कायम करावी किंवा 850 विद्यार्थीनींची संख्या असलेले जी. के कला व विज्ञान महाविद्यालयालाच नवीन परीक्षा केंद्र जाहीर करावे अशी मागणी विद्यार्थीनी करत आहेत.
आमगाव, सालेकसा तालुका हे आदिवासी नक्षलग्रस्त भागातील तालुके असून आमगाव सालेकसा मार्गावरील कावराबांध येथे अनुदानित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संलग्नित जी. के कला व विज्ञान महिला महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात आजूबाजूच्या परिसरातील आदिवासी भागातील विद्यार्थी शिक्षण घेतात.
यापूर्वी या महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींचे परीक्षा केंद्र एक किलोमीटर अंतरावरील झालीया येथील विना अनुदानित महाविद्यालयात होते. हे परीक्षा केंद्र फक्त एक किलोमीटर अंतरावर असल्यामुळे भर उन्हातही परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी व वेळेत पोहोचण्यासाठी सोयीस्कर होते. 15 मेपासून पदवीची परीक्षा सुरू झाली असून विद्यार्थ्यांना किंवा कावराबांध येथील महाविद्यालयाला कुठलीही पूर्वसूचना न देता परीक्षा केंद्र परीक्षेच्या दोन दिवसापूर्वी मिळालेल्या हॉल तिकीटद्वारे समजले.
विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र एम. बी पटेल महाविद्यालयात असल्याचे कळले. विद्यापीठाच्या या निर्णयाचा विद्यार्थ्यांना मोठा धक्काच बसला. काही विद्यार्थ्यांच्या घरापासून हे परीक्षा केंद्र 25 ते 30 किलोमीटर लांब आहे. या मार्गावर वेळेवर बसची सोय नाही. नक्षलग्रस्त प्रभावित भागातून सायंकाळी परत येण्यासाठी बसची संख्या फार कमी असल्यामुळे पालकांना मुली घरी परत येण्यापर्यंत काळजी लागते. यामुळे परीक्षा केंद्र बदलण्यात यावे अशी मागणी सातत्याने केली जातंय.