Bihar Election 2025: नितीशबाबूंची एक चाल नि जेडीयूत मोठी फूट? भाजप पण कच्च्या गुरूचा चेला नाही, मुख्यमंत्री पदावरून पडद्याआड काय घडामोडी?

Bihar Election Result 2025: बिहार निवडणुकीचे कवित्व अजून संपलेले नाही. सध्या 'ही दोस्ती तुटायची नाय' असा सूर नितीश बाबू आणि भाजपने आळवला असला तरी मुख्यमंत्री पदावरून सस्पेन्स सुटलेला नाही. अगोदर नितीश बाबूंचे नाव चर्चेत होते, पण निकाल आल्यानंतर चित्र पालटले आहे.

Bihar Election 2025: नितीशबाबूंची एक चाल नि जेडीयूत मोठी फूट? भाजप पण कच्च्या गुरूचा चेला नाही, मुख्यमंत्री पदावरून पडद्याआड काय घडामोडी?
बिहारचे सत्ताकारण
Updated on: Nov 15, 2025 | 1:17 PM

Nitish Kumar CM Undercurrent: बिहार निवडणुकीचा अद्भूत निकाल समोर आला. सर्वच जण अचंबित झाले. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची त्सुनामी आली. त्यात महाआघाडीचा सुपडा साफ झाला. काँग्रेसची अवस्था तर विचारायची सोय राहिली नाही, अशी झाली आहे. तेजस्वी यादव यांनी स्वप्न दाखवूनही तरुणांनी त्यांना काठावर पास केले. एमआयएमने जोरदार कामगिरी करून दाखवली. तर भाजप अपेक्षेप्रमाणे बिग ब्रदर ठरला. इतक्या वर्षात दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावरील भाजप यंदा पहिल्या क्रमांकवर आला आहे. त्यामुळे भाजप नेत्याचा सूर आणि नूर पालटला आहे. यापूर्वी नितीश कुमार हेच आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्याचा दावा करणारे भाजप नेते आता वरिष्ठ याविषयीचा निर्णय घेतील असा सूर आळवत आहेत. त्यामुळे बिहारमध्ये नवीन राजकीय समीकरणं दिसतील का? असा दावाही करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच?

काल दुपारी निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यावर जनता दल(संयुक्त) पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून नितीश कुमार हेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्याचे जाहीर केले. पण त्यानंतर भाजपच्या जागा वाढल्या आणि ही पोस्ट डिलिट करण्यात आले. त्यामुळे नितीश कुमार आणि पक्षाच्या मनात काय आहे हे पोटातील ओठांवर आले. पण गंमत आकड्यांची आहे. एका मांडणीनुसार, नितीश कुमार यांना 10 व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यासाठी ते बिगर भाजपचे सरकार पण अस्तित्वात आणू शकतात. त्यासाठीची आकडेवारी त्यांच्या बाजूने असल्याची जमेची बाजू आहे. बिहार विधानसभेचे 243 सदस्य आहेत. बहुमताचा आकडा 122 इतका आहे. जेडीयूकडे 85 जागा आहेत. त्यांना 37 जागांची गरज आहे. हा आकडा नितीशबाबू सहज जुळवू शकतात.

पलटूराम यांना मोठा झटका

भाजप नेत्यांनी यापूर्वी नितीश कुमार यांना पलटूराम म्हणून चिमटा काढला आहे. त्यामुळे भाजप सरकारने मुख्यमंत्री पदासाठी नितीश कुमार यांचे नाव नाकारले आणि दोन्ही पक्षात तेढ निर्माण झाली तर मग पुढे जेडूयीमध्ये मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी सुद्धा जेडीयू फुटीच्या उंबरठ्यावर आला होता. पण त्यावेळी ही डॅमेज कंट्रोल करण्यात नितीश कुमार यांना यश आले होते.

जेडीयूला सुरूंग लावण्याचा अनेकदा प्रयत्न

जेडीयूला अनेकदा सुरुंग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. डिसेंबर 2023 मध्ये आणि त्यापूर्वी सुद्धा जेडीयू फुटीच्या उंबरठ्यावर होती. त्यावेळी 11 आमदारांची एक गुप्त बैठक झाली होती. त्यावेळी जेडीयू फुटण्याची भीती व्यक्त झाली होती. तर गेल्या वर्षी सुद्धा असाच प्रयोग झाला होता. यंदा एप्रिलपासूनच जनता दल (संयुक्त) पक्षात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

नितीश कुमारांची पलटू रामची खेळी अशक्य

जर नितीश कुमार यांनी विरोधकांना हातीशी धरून सरकार स्थापन्याचा प्रयत्न केला तर यावेळी जेडीयूत भूंकप होऊन मोठ्या संख्येने आमदारांचा वेगळा गट तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीला असाच सुरूंग लावण्यात आला हे राजकारणात विसरून चालत नाही. त्यामुळे हा गट भाजपसोबत जाऊ शकतो. जर समजा नितीश कुमार यांचा पक्ष फुटलाही नाही तरी भाजप चिराग पासवान यांच्या जनशक्ती पार्टी हम आणि आरएलएमसह सहज सत्तेत येऊ शकते, हे पण विसरून चालणार नाही. त्यामुळे बिहारच्या सत्ता स्थापनेत जर तरच्या या गणितात शहाणपण कोण दाखवते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.