Sangli Election Final Result 2024: अपक्ष विशाल पाटील यांचा भाजपच्या संजयकाका पाटील यांना दणका, सांगलीत मोठी उलथापालथ
Sangli Lok Sabha Election Final Result 2024: सांगली लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत बघायला मिळाली आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, अपक्ष उमेदवार विशाल पाटील इथे विजयी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. विशेष म्हणजे एक्झिट पोलचा हा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यावेळी चांगलीच चर्चेची ठरली. ही निवडणूक चर्चेत राहण्यामागील कारण म्हणजे महाविकास आघाडीत घडलेल्या घडामोडी. या लोकसभा मतदारसंघाची खरंतर काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख आहे. पण 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती. तसेच भाजपने देखील चांगली ताकद लावली. त्यामुळे या मतदारसंघात 2014 मध्ये संजय काका पाटील यांचा विजय झाला. विशेष म्हणजे 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही संजयकाका पाटील यांचा विजय झाला. त्यानंतर यावेळी पुन्हा संजयकाका पाटील हे विजयाची हॅट्रीक मारतात का? हे आज स्पष्ट झालं आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांचा पराभव झाला आहे. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी त्यांचा पराभव केला आहे. विशाल पाटील यांना 4 लाख 43 हजार 779 मतं मिळाली आहेत. तर संजय काका पाटील यांना 3 लाख 99 हजार 955 मतांवर समाधान मानावं लागलं आहे. याशिवाय ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा दारुण पराभव झाला आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत अनपेक्षित घडामोडी घडल्या. काँग्रेसला कोल्हापूरची जागा दिल्यामुळे ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर दावा केला. दुसरीकडे काँग्रेसचा देखील या जागेवर दावा होता. त्यामुळे महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरुन चांगलीच रस्सीखेच बघायला मिळाली. महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवर अंतिम निर्णय होण्याआधीच ठाकरे गटाने या मतदारसंघातून आपला उमेदवार जाहीर केला. ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवार जाहीर केली. यानंतर काँग्रेसमध्ये घडामोडी वाढल्या.
ठाकरे गटाने सांगलीच्या जागेबाबत केलेल्या घोषणेवर सुरुवातीला काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी जाहीर केली. तर सांगलीचे स्थानिक नेते थेट पक्षाच्या दिल्लीच्या हायकमांडपर्यंत गेले. काँग्रेसमधील विशाल पाटील हे सांगलीच्या जागेसाठी आग्रही होते. विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम यांनी दिल्लीत जावून पक्षाच्या वरिष्ठांसोबत चर्चा केली. पण ठाकरे गटाचा आग्रह पाहता काँग्रेसच्या वरिष्ठांनी कोल्हापूरच्या मोबदल्यात सांगलीची जागा ठाकरे गटाला देण्यात आल्याचं अधिकृतपणे पक्षाला सांगितलं. यानंतर विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. पण त्यानंतर काँग्रेसकडून त्यांच्यावर पक्षशिस्तीचं पालन न केल्याबद्दल कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यामुळे ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडल्याचंही बघायला मिळालं.
सांगली लोकसभा मतदारसंघात मिरज विधानसभा मतदारसंघ, सांगली विधानसभा मतदारसंघ, पलुस-कडेगांव विधानसभा मतदारसंघ, खानापूर विधानसभा मतदारसंघ, तासगांव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघ, जत विधानसभा मतदारसंघ या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. सांगली लोकसभेत यावेळी 20 उमेदवारांनी आपलं नशिब आजमवलं आहे. पण असं असलं तरी खरी लढत ही महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील, महायुतीचे संजयकाका पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यात ठरली.
निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :
लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स
