शिंदे गटाला खिंडार? शिवाजी आढळराव पाटील उद्या अजित पवार गटात जाण्याची शक्यता

| Updated on: Mar 22, 2024 | 10:27 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात सध्या जोरदार हालचाली घडत आहेत. महायुतीत शिरुरची जागा अजित पवार गटासाठी सुटण्याची शक्यता आहे. पण शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील हे या ठिकाणी जास्त इच्छुक आहेत. तसेच ते खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात शिरुरमध्ये प्रबळ उमेदवार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महायुती आता मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे. शिवाजी आढळराव पाटील यांचा उद्या अजित पवार गटात प्रवेश होण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाला खिंडार? शिवाजी आढळराव पाटील उद्या अजित पवार गटात जाण्याची शक्यता
शिवाजी आढळराव पाटील उद्या अजित पवार गटात जाण्याची शक्यता
Follow us on

शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील यांचा उद्या अजित पवार गटात प्रवेश होणार असल्याची शक्यता आहे. सूत्रांकडून याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत शिरुरमधील अजित पवार गटाचे आमदार उपस्थित राहणार आहेत. अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर उद्या (23 मार्च) सकाळी 10 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत शिवाजी आढळराव पाटील यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिरुरमध्ये खासदार अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील अशी लढत होण्याची शक्यता आहे.

अजित पवार यांनी उद्या सकाळी दहा वाजता राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची देवगिरी बंगल्यावर बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिरुर लोकसभा मतदारसंघातील अजित पवार गटाच्या आमदारांनादेखील बोलावण्यात आलं आहे. तसेच या बैठकीचं निमंत्रण शिवाजी आढळराव पाटील यांनाही देण्यात आलं आहे. या बैठकीत शिवाजी आढळराव पाटील यांना पक्षात घेण्याबाबत चर्चा होणार आहे. आढळराव पाटील यांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्याबाबत या बैठकीत निश्चित होण्याची शक्यता आहे. या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्यानंतर आढळराव पाटील यांचा उद्या अजित पवार गटात पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

शिवाजी आढळराव आधीपासून इच्छुक

शिरुरमध्ये शिवाजी आढळराव पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील हे एकमेकांच्या राजकीय शत्रू असल्याचं आतापर्यंत बघायला मिळालं होतं. शिरुर लोकसभेची जागा महायुतीतून कोण लढणार? यावरुन वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील यांनी आधीच या जागेवर दावा केला. त्यामुळे ही जागा महायुतीत शिंदे गटाला सुटणार का? अशी चर्चा सुरु झाली. पण अजित पवार गटाचादेखील या जागेवर दावा होता. अमोल कोल्हे हे शिरुरचे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे ही जागा आपली असल्याचा दावा अजित पवार गटाने केला.

अजित पवार गट शिरुरची जागा सोडण्यास तयार नसल्याची माहिती समोर आल्यानंतर शिवाजी आढळराव पाटील यांच्याबाबत वेगळ्या बातम्या समोर यायला लागल्या. शिवाजी आढळराव पाटील हे निवडणूक लढवण्यास ठाम होते. त्यामुळे त्यांना शिवसेनेकडून तिकीट मिळालं नाही तर ते अजित पवार गटाच्या तिकीटावरही निवडणूक लढवण्यास तयार असल्याची चर्चा सुरु झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती असल्यामुळे आढळराव पाटील राष्ट्रवादीच्या घड्याळ तिकीटावरही लढायला तयार असल्याची माहिती समोर आली. यासाठी त्यांनी तातडीने कार्यकर्त्यांची बैठकही घेतली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी आढळराव पाटील यांना होकार कळवला आणि आढराव यांचा अजित पवार गटात जाण्याच्या चर्चांना जास्त उधाण आलं.

आढळराव पाटील यांना आधी मोहिते पाटलांचा विरोध

शिवाजी आढळराव पाटील हे राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. मोहिते पाटील यांना राजकारणातून संन्यास घेण्याची भाषा केली. अखेर अजित पवार यांनी मोहिते पाटील यांची भेट घेत त्यांची समजूत काढली. त्यानंतर मोहिते पाटील आढळराव पाटील यांच्या उमेदवारीवर सकारात्मक झाले. आढळराव पाटील यांना विरोध करणारं किंवा त्यांचा उमेदवारीवर आक्षेप घेणारं महायुतीत कुणी नसल्यामुळे आता ते घड्याळ चिन्हावरही निवडणूक लढले तरी त्यांना कोणतीही अडचण येणार नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.