नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी हरल्या तर नेमकं काय होणार? मुख्यमंत्री कोण होणार?

देशातील सर्वात हायव्होल्टेज फाईट होत असलेल्या नंदीग्राम विधानसभा मतदारसंघावर (Nandigram Assembly Constituency, ) सर्वांच्या नजरा आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:25 PM, 2 May 2021
नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी हरल्या तर नेमकं काय होणार? मुख्यमंत्री कोण होणार?
mamata banerjee vs suvendu adhikari

कोलकाता : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल (West Bengal Assembly Election 2021) आज जाहीर होत आहे. देशातील सर्वात हायव्होल्टेज फाईट होत असलेल्या नंदीग्राम विधानसभा मतदारसंघावर (Nandigram Assembly Constituency, ) सर्वांच्या नजरा आहेत. इथे बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) विरुद्ध ममतांची साथ सोडून भाजपमध्ये गेलेले सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांच्यात लढत होत आहे. सुरुवातीच्या कलांनुसार ममता बॅनर्जींना इथे धक्का बसण्याची चिन्हं आहेत. कारण सकाळी 11.45 पर्यंत हाती आलेल्या कलांनुसार, ममता बॅनर्जी या जवळपास 4500 मतांनी पिछाडीवर होत्या. (West Bengal Nandigram Assembly Election result live Mamata Banerjee Trailing BJP’s Suvendu Adhikari who will Bengal next CM)

जर ममता बॅनर्जी हरल्या तर तृणमूलसाठी हा मोठा धक्का असेल. भाजपने ममतांच्या मंत्रिमंडळातील बडा चेहरा असलेले शुभेंदू अधिकारी यांनाच फोडल्याने, ममतांचा संताप अनावर झाला. त्यामुळे ममतांनी शुभेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांचा गड असलेल्या नंदिग्राम विधानसभा (Nandigram Vidhan Sabha) मतदारसंघातून मैदानात उतरण्याचा निर्धार केला. मात्र आपला बालेकिल्ला असलेल्या नंदीग्राममध्ये शुभेंदू अधिकारी यांनी सध्यातरी नेटाने लढा देत, ममतांवर वर्चस्व मिळवल्याचं चित्र आहे.

पारंपारिक मतदारसंघ सोडला

भवानीपूर हा ममता बॅनर्जी यांचा पारंपारिक मतदारसंघ आहे. मात्र त्यांनी नंदीग्राममधून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. भाजपचे नेते शुवेंदू अधिकारी यांनी 2016 मध्ये तृणमूलच्या तिकिटावर नंदीग्राममधून निवडणूक लढवली होती. मात्र, सुवेंदू अधिकारी यांच्यासह खासदार सुनील मंडल, माजी खासदार दशरथ तिर्की यांच्यासह 10 आमदारांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यातील पाच आमदार तृणमूलचे होते.

ममतांचा पराभव झाल्यास मुख्यमंत्री कोण?

सध्याची आकडेवारी पाहता ममता बॅनर्जी या जरी पिछाडीवर असल्या, तरी तृणमूल काँग्रेसने मुसंडी मारली आहे. 292 जागांच्या विधानसभेत तृणमूलने 200 जागांवर आघाडी घेतली आहे. भाजप सध्या तरी 100 च्या आत गुंडाळताना दिसत आहे. असं असलं तरी ममतांचा जर नंदीग्राममध्ये पराभव झाला तर तृणमूलसाठी मोठी नामुष्की असू शकते.

…तर मुख्यमंत्री ममताच?

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव झाला तरी सरकार मात्र त्यांचंच म्हणजे तृणमूलचं येताना दिसत आहे. अशा परिस्थितीत ममता बॅनर्जी यांच्याकडेच मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवली जाऊ शकते. ममता बॅनर्जी पुन्हा शपथ घेऊन, सहा महिन्यांच्या आत कोणत्या तरी दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवून आमदार होऊ शकतात. त्यासाठी तृणमूलचा एखाद्या विजयी आमदाराला राजीनामा द्यावा लागू शकतो.  मात्र जर पराभवाची नैतिकता म्हणून ममतांनी मुख्यमंत्रिपद नाकारलंच तर मात्र मुख्यमंत्रिपद दुसऱ्याला मिळू शकतं.

कोण कोण शर्यतीत? 

जर ममतांनी मुख्यमंत्रिपद नाकारलं तर त्या आपल्या मर्जीतील माणसालाच मुख्यमंत्रिपद देणार हे निश्चित आहे. शोभानदेव चटोपाध्याय, पार्थ चॅटर्जी, कांचन मुलीक, सुब्रता मुखर्जी ही काही नावं आहेत, जी तृणमूल आणि विशेषत: ममता बॅनर्जी यांच्या विश्वासातील आहेत.

विधानपरिषदेचा पर्याय नाही 

दरम्यान, ममतांचा जर पराभव झाला तर त्यांना विधीमंडळ सभागृहात जाण्यासाठी महाराष्ट्राप्रमाणे विधानपरिषदेचा पर्याय नाही. पश्चिम बंगालमध्ये विधानपरिषदच अस्तित्त्वात नाही. त्यामुळे हा पर्याय आपोआपच बंद झाला.

8 उमेदवार मैदानात, पण लढत दोघात

पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात नंदीग्राम मतदारसंघ येतो. ही पश्चिम बंगालमधील सर्वात हाय प्रोफाईल सीट आहे. नंदीग्राममध्ये एकूण 8 उमेदवार मैदानात आहे. टीएमसीच्या नेत्या ममता बॅनर्जी, भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी, सीपीआयएमच्या नेत्या मिनाक्षी मुखर्जी यांच्यासह इतर पाच उमेदवार मैदानात आहे. परंतु, मुख्य लढत ही ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी यांच्यातच आहे. सुवेंदू अधिकारी हे या मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघाच्या इतिहासात इथे पाच वेळा CPI, दोन वेळा CPM, दोन वेळा काँग्रेस, एक वेळ जनता पार्टी आणि तीन वेळा TMC ने विजय मिळवला आहे. या मतदारसंघातील मतदारांची संख्या जवळपास अडीच लाख आहे.

नंदिग्रामला विशेष महत्त्व का?

नंदिग्राम हे केवळ एक गाव किंवा एक मतदारसंघ नाही तर बंगालच्या राजकारणाच्या बदलाचं प्रतिक आहे. पश्चिम बंगालच्या इतिहासात नंदिग्रामला विशेष महत्त्व आहे. स्वातंत्र्याच्या आधी नंदिग्रामच्या आंदोलनाने ब्रिटीशांनाही हात टेकायला भाग पाडलं होतं. नंदिग्राममध्ये 2007 मध्ये सर्वात उग्र आंदोलन झालं होतं. जमीन अधिग्रहणाविरोधात आंदोलन करुन, ममता बॅनर्जींनी डाव्यांचं सरकार हद्दपार करुन सत्तेत आल्या होत्या. 2007 मध्ये तत्कालिन बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या नेतृत्त्वातील सरकारने जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरु केली होती. बुद्धदेव भट्टाचार्य सरकारने सलीम ग्रुपला ‘स्पेशल इकॉनॉमिक झोन’ म्हणून नंदिग्राममध्ये एक केमिकल फॅक्टरी उभी करण्यास मान्यता दिली होती. याविरोधात बंगालमध्ये रान उठलं होतं.

ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला होता. तृणमूलने विरोधी पक्षांची मोट बांधून सरकारविरोधात पवित्रा घेत आंदोलन केलं. या आंदोलनाचं नेतृत्त्व तत्कालीन विरोधी पक्षनेत्या ममता बॅनर्जी यांनी केलं होतं. तर या आंदोलनाचे नायक होते शुभेंदू अधिकारी.

2016 ला काय घडलं?

2016मध्ये पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममध्ये भाजपला साडे पाच टक्क्याहून कमी मते मिळाले होते. या मतदारसंघात एकूण वैध मते 2 लाख 1 हजार 552 आहेत. भाजपचे उमदेवार बिजन कुमार दास यांना केवळ 10 हजार 713 मते मिळाली होती. तर तृणमूलचे तेव्हाचे उमेदवार शुभेंदू अधिकारी यांनी नंदीग्राममधून महाविजय मिळवला होता. त्यांना 1 लाख 34 हजार 623 मते मिळाली होती. त्यांना एकूण 67.2 टक्के मते मिळाली होती. त्यांनी सीपीआयचे उमेदवार अब्दुल कबीर शेख यांना 81 हजार 230 मतांनी पराभूत केलं होतं. कबीर शेख यांना केवळ 53 हजार 393 मते मिळाले होते. या ठिकाणी भाजप तिसऱ्या नंबरवर फेकली गेली होती. मात्र दोन आणि तिसऱ्या नंबरच्या उमेदवारांमध्येही 40 हजार मतांचा फरक होता.

गेल्या निवडणुकीतील आकडेवारी

विद्यमान आमदार : सुवेंदू अधिकारी
मिळालेली एकूण मते : 134623
एकूण मतदार : 231866
मतांची टक्केवारी : 86.97 टक्के
एकूण उमेदवार : 5

संबंधित बातम्या 

ममता बॅनर्जींना सत्तेत आणणाऱ्या नंदिग्रामची कहाणी, पुन्हा नंदिग्राम का गाजतंय?

Special Report : नंदिग्राम ममता बॅनर्जींसाठी गेमचेंजर ठरणार?

(West Bengal Nandigram Assembly Election result live Mamata Banerjee Trailing BJP’s Suvendu Adhikari who will Bengal next CM)