“मी त्या नशेत..”; आमिर खानला अश्रू अनावर, व्यक्त केली आयुष्यभराची खंत
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिरने त्याची सर्वांत मोठी खंत बोलून दाखवली. यावेळी त्याला अश्रू अनावर झाले. कोविड महामारीच्या काळात आमिरला याची जाणीव झाली होती. त्यानंतर त्याने कुटुंबीयांची आणि मुलांची माफीदेखील मागितली.

अभिनयातून काही काळ ब्रेक घेतल्यानंतर अभिनेता आमिर खान पुन्हा पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. आगामी ‘सितारें जमीन पर’ या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या नुकत्याच एका मुलाखतीत आमिर त्याच्या मुलांबद्दल बोलताना भावूक झाला होता. करिअरमध्ये जरी अपेक्षित यश मिळवलं असलं तरी मुलांचा पिता म्हणून कमी पडल्याची खंत आमिरने बोलून दाखवली. यावेळी त्याच्या डोळ्यात अश्रू स्पष्ट पहायला मिळत होते. कोविड महामारीच्या काळात आमिरला त्याच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाच्या गोष्टीची जाणीव झाली आणि त्यानंतरच त्याने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. इतकंच नव्हे तर आमिरने थेट इंडस्ट्री सोडण्याचाही निर्णय घेतला होता, परंतु पूर्व पत्नी किरण राव आणि मुलांनी समजूत काढल्यानंतर त्याने तो निर्णय मागे घेतला.
‘आप की अदालत’ या कार्यक्रमात आमिर म्हणाला, “वयाच्या 18 व्या वर्षी माझ्या या प्रवासाची सुरुवात झाली होती. कल्पकतेच्या या नशेत मी प्रचंड बुडालो होतो. कोविड महामारीच्या वेळी घरात एकटाच बसल्यावर मी विचार केला की आतापर्यंतचं माझं आयुष्य कसं होतं? जर कोविड नसता तर त्याच गतीने मी पुढे गेलो असतो. कोविडमुळे मला बळजबरीने घरी बसावं लागलं आणि तेव्हा मला याची जाणीव झाली की, आमिर तू हे काय केलंस? मी कधीच माझ्या कुटुंबीयांना पुरेसा वेळ दिला नाही. त्यांच्यासोबत असतानाही मी सतत कामाचा विचार करायचो. कोविडमध्ये घरी बसून या सगळ्या गोष्टींचा विचार करत मी नैराश्यात गेलो होतो. मला खूप वाईट वाटलं होतं. माझं मन पश्चात्तापाने भरलं होतं. मी त्या नशेत राहायला पाहिजे नव्हतं. मी माझ्या मुलांशी आणि कुटुंबीयांशी नीट वागलो नाही.”
याविषयी आमिर पुढे म्हणाला, “मला स्वत:चाच राग येत होता, कारण ती वेळ काही परत येणार नव्हती. माझी मुलं मोठी झाली होती. या सर्व गोष्टींना आता चार वर्षे झाली आहेत. जेव्हा मी कामाच्या नशेत बुडालो होतो, तेव्हा मला हेसुद्धा माहीत नव्हतं की, जेव्हा माझी मुलगी आयरा 4-5 वर्षांची असताना काय विचार करायची? तिची काय स्वप्ने होती? ती कोणत्या गोष्टींना घाबरायची? कारण या सर्व गोष्टींकडे मी कधी लक्षच दिलं नव्हतं. माझ्या दिग्दर्शकांची काय स्वप्नं आहेत, ती मला माहित आहेत. पण माझ्या मुलांबद्दल मला काहीच माहीत नव्हतं. मला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं होतं, खूप राग येत होता. त्यानंतर मी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. मी माझ्या कुटुंबीयांसोबत, मुलांसोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला (रडतो).”
“तेव्हाच मी विचार केला होता की ‘लाल सिंग चड्ढा’ हा माझा शेवटचा चित्रपट असेल. मी माझ्या कुटुंबीयांचीही माफी मागितली. त्यांना माझ्या निर्णयाबद्दल सांगितलं. मी इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय मनाशी पक्का केला होता. तोपर्यंत मी ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट लॉक केला होता. सहा-सात महिन्यांनंतर मी दिग्दर्शकांना बोलावून माझा निर्णय सांगणार होतो. परंतु तेव्हा मला माझ्या मुलांनी समजावलं की मी काम करत राहिलं पाहिजे. टोकाची भूमिका घेऊ नये. किरणनेही माझी समजूत काढली. ज्या लोकांना मी सर्वांत कमी वेळ दिला होता, त्यांनीच मला समजावलं की मी चित्रपटांमध्ये काम करत राहिलं पाहिजे. त्यामुळे मी फिल्म इंडस्ट्री सोडणार नाही”, असं आमिरने स्पष्ट केलं.
