
नव्वदच्या दशकात प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ‘आशिकी’ हा चित्रपट तुफान गाजला होता. यामध्ये राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटानंतर अनु बॉलिवूडमधील अत्यंत लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्री होईल, असं सर्वांना वाटलं होतं. परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. 1999 मध्ये अनुचा भीषण अपघात झाला होता. या अपघातानंतर ती कोमात गेली होती आणि शुद्धीवर आल्यानंतरही तिला अनेक महिने काहीच आठवत नव्हतं. या अपघाताचा मोठा परिणाम अनुच्या करिअरवर झाला आणि ती बॉलिवूडपासून दूर गेली. आता बऱ्याच वर्षांनंतर अनुला पुन्हा अभिनयक्षेत्रात पुनरागमन करायचं आहे. यासाठी ती विविध मुलाखती देत असून कार्यक्रमांनाही उपस्थित राहत आहे. मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात अनु अग्रवाल उपस्थित होती. परंतु यावेळी तिचे कपडे पाहून नेटकऱ्यांनी खूप ट्रोल केलं.
अनुने या कार्यक्रमात शॉर्ट ड्रेस घातला होता. यावेळी तिने पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ दिले. परंतु अशा पोशाखात तिला पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘अनु, आम्ही तुझा खूप आदर करतो, कृपया तू सुद्धा स्वत:चा आदर कर’, असं एकाने लिहिलं. तर ‘तिने बरंच काही सहन केलंय. या वयात ती पुन्हा ताठ मानेनं उभं राहण्याचा प्रयत्न करतेय. त्यामुळे तिच्यावर टीका करू नका’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘अनुच्या ड्रेसिंग सेन्सला झालंय तरी काय’, असा सवाल काहींनी केला. तर काहींनी अनुला समजून घेण्याचं आवाहन नेटकऱ्यांना केलंय.
“तो फक्त कठीण काळ नव्हता. तर माझ्या जगण्या-मरण्याचा प्रश्न होता. मी कोमामध्ये होती. मी जगू शकेन की नाही, असा प्रश्न कुटुंबीयांना पडला होता. त्यातही मी वाचले तर पॅरालाइज्ड होईन की काय, अशीही भीती त्यांना होती. जवळपास 30 दिवसांनंतर मी कोमातून बाहेर आली. परंतु त्यानंतर बराच वेळ मी बेडवरून उठू शकत नव्हती. कारण माझं अर्ध शरीर पॅरालाइज्ड होतं,” असं अनुने एका मुलाखतीत सांगितलं होतं. या अपघाताचा परिणाम अनुच्या मानसिक आरोग्यावरही प्रचंड झाला होता.