Rahul Roy : माझेही खर्च आहेत.. लग्नातील डान्समुळे ट्रोल करणाऱ्यांना राहुल रॉयने सुनावलं
अभिनेता राहुल रॉयने ब्रेन स्ट्रोकनंतरच्या आर्थिक अडचणी आणि कायदेशीर संघर्षावर मोकळेपणाने भाष्य केलं. ‘आशिकी’ स्टारला 60 व्या वर्षी शून्यातून पुन्हा सुरुवात करावी लागत आहे. तो लग्न समारंभांमध्ये परफॉर्म करून उत्पन्न मिळवतोय. ट्रोल करणाऱ्यांना त्याने चांगलंच सुनावलंय.

‘आशिकी’, ‘जुनून’, ‘फिर तेरी कहानी याद आए’ यांसारख्या चित्रपटात काम केलेला अभिनेता राहुल रॉय (Rahul Roy) सर्वांनाच माहित आहे. काही महिन्यांपूर्वी एका रील मधील डान्समुळे तो चर्चेत आला होता, असं काम करायची गरज काय असा प्रश्न विचारत सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात आलं होतं. याचबाबत आता राहुल रॉय स्पष्टपणे बोलला असून त्याने आर्थिक अडचणींबद्दलही सांगितलं. गेल्या वर्षी राहुल रॉय हा एका लग्नात डान्स करताना आणि त्याच्याच गाण्यांवर परफॉर्म करताना दिसला होता. त्याचे काही व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आर्थिक तंगीमुळे राहुल रॉयला छोट्या-मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये आणि लग्नात डान्सस करावा लगतोय, अशी चर्चा रंगली होती. त्यावरून बरेट उलट-सुलट अंदाजही व्यक्त करण्यात आले.
आता ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये राहुल रॉय हा त्याच्यासमोर असलेली आर्थिक आव्हान आणि 2020 साली ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर करिअरवर पुन्हा फोकस करण्याबद्दल मोकळेपणाने बोलला.
राहुल रॉयचा पुन्हा श्रीगणेशा
‘आशिकी’ या सुपरहिट चित्रपटातून रातोरात लोकप्रिय झालेला अभिनेता राहुल रॉय सध्या आपल्या आयुष्यातील कठीण टप्प्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. 2020 मध्ये आलेल्या ब्रेन स्ट्रोकनंतर त्याच्या आयुष्यात अनेक बदल झाले. त्यात कामापासून दूर राहणं, आर्थिक अडचणी आणि कायदेशीर प्रकरणांचा सामना यांचा समावेश आहे. राहुल यांनी नुकतेच आपल्या संघर्षाबद्दल खुलासा केला. त्याने सांगितलं की, तो आणि त्याचा भाऊ गेल्या काही वर्षांपासून एका कायदेशीर प्रकरणाचा सामना करत आहेत. हे प्रकरण सुमारे 30 लाख रुपयांचं असून ते लवकरात लवकर मिटवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यासाठी ते दोघं मिळून काम करत आहेत.
घटस्फोटानंतर पुन्हा नव्याने सुरुवात
पुढे राहुल रॉयने सांगितलं की, घटस्फोटाच्या काळात त्याने त्याची मालमत्ता पत्नीच्या नावावर केली होती. त्यामुळे आता वयाच्या 60व्या वर्षी त्याला पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागत आहे. आपल्या परिस्थितीबद्दल बोलतानातो म्हणाला ‘मी 60 वर्षांचा आहे आणि माझं संपूर्ण जग पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या पाच वर्षांचा काळ त्यांच्या आयुष्यात जवळपास ब्रेकसारखा होता. ब्रेन स्ट्रोकनंतर मी उपचार आणि रिकव्हरीमध्ये व्यस्त होतो. या काळात माझ्याकडे फारसं काम नव्हतं. मात्र, आता हळूहळू मला पुन्हा काम मिळू लागलं असून, आणखी काम करण्याची इच्छा आहे, ‘ असं तो म्हणाला.
‘सेटवर परत जाणं आणि कॅमेऱ्यासमोर पुन्हा उभं राहणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा मी आभारी आहे. चित्रपटसृष्टीतील माझ्या 37 वर्षांच्या प्रवासात मी काही चांगले काम केलं आहे आणि आता पुढेही चांगले काम करण्याची मला आशा आहे,’असंही राहुल रॉय म्हणाला.
ब्रेन स्ट्रोकनंतर पुन्हा काम मिळवणे किती कठीण होते, याबद्दलही राहुलने मोकळेपणाने भाष्य केलं. ‘ माझेही खर्च आहेत आणि त्यामुळे मला काम करून पैसे कमावणं गरजेचं आहे. 2020 मध्ये ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर काम मिळणं खूप कठीण होतं. त्याला आता पाच वर्षे झाली आहेत. या काळात परिस्थिती सांभाळण्यासाठी मी जे काही करू शकत होतो, ते करत राहिलो. कधी-कधी लग्नसमारंभांमध्ये डान्स करून 2 ते 4 लाख रुपये कमावतो. जे लोक मला ट्रोल करतात, त्यांना हे काम किती मेहनतीचं आहे, याची कल्पना नाही. मलाही माझी रोजीरोटी कमवायची आहे,’ असं म्हणत राहुल यांनी ट्रोलर्सना सुनावलं.
सलमान खानने दिली साथ
या वाईट काळात इंडस्ट्रीतील अनेकांनी मदत केल्याचं त्याने आवर्जून सांगितलं. सलमान खान, करिश्मा कपूर, रवीना टंडन, फराह खान, अर्चना पूरन सिंग आणि पूजा भट्टचं त्याने नव घेतलं. ब्रेन स्ट्रोकनंतर राहुल याच्या उपचारांसाठी सलमान खान यांनीही त्याला आर्थिक मदत केली होती. ‘मी अनु अग्रवाल, दीपक तिजोरी आणि अवतार गिल यांच्या संपर्कात आहे. महेश भट्ट यांच्याशीही माझा संपर्क आहे. दीपक सध्या चांगले काम करतोय. आम्ही पुन्हा एकदा एकत्र काम करण्यासाठी भेटू’ अशी आशाही त्याने व्यक्त केली.
डान्सिंग रील्सवर ट्रोल झाल्यानंतर राहुलने दिलं होतं उत्तर
याच वर्षी एप्रिलमध्ये राहुल रॉयचे काही डान्सिंग रील्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या व्हिडिओंवरून त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर राहुल याने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या परिस्थितीबद्दल स्पष्टीकरण दिलं होतं.
‘मी माझे काम प्रामाणिकपणे आणि नम्रतेने करतो. मला काही कायदेशीर प्रकरणांचा खर्च उचलायचा आहे आणि ही प्रकरणं मला ब्रेन स्ट्रोक यायच्या आधीपासूनची आहेत. माझ्या साधेपणाची खिल्ली उडवणं किंवा माझ्या अडचणींवर हसणं, यावरून तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल जास्त कळतं. ‘ असं म्हणत त्याने ट्रोलर्सना फटकारलं होतं. ‘ जर तुम्हाला खरोखरच माझी काळजी असेल, तर मला एखादे चांगले आणि सन्मानजनक काम मिळवून देण्यासाठी मदत करा, निदान मी इतरांची खिल्ली उडवून नाही, तर मेहनत करून पैसे कमावतोय’ असंही त्याने सुनावलं.
