हो मी जयभीमवाली, मी त्यांच्यातली… मराठमोळी अभिनेत्री बेधडक बोलली…त्या विधानाची चर्चा!
चिन्मयी सुमित या आपली भूमिका परखडपणे मांडणाऱ्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. एका कार्यक्रमात बोलताना होय मी जयभीमवाली आहे, असे त्या म्हणाल्या आहेत. मी नमस्कार केल्यानंतर जयभीम म्हणते असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Chinmayi Sumit : मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत असे काही नट आणि नट्या आहेत ज्यांच्या विचारात फारच स्पष्टता आहे. हे कलाकार समाजिक भान तर जपतातच परंतु ते समाजाप्रती फारच संवेदनशीलही आहेत. काही कलाकार तर जातीय भेदभाव, स्त्री-पुरुष समानता यावर रोखठोकपणे बोलताना दिसतात. दरम्यान, आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत वेगळे आणि मानाचे स्थान मिळवणाऱ्या दिग्गज अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी होय मी जयभीमवाली आहे, असे रोखठोक भाष्य करत मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची पाईक आहे, असे सांगितले आहे. स्त्रियांना माणूस म्हणून संविधानाने अधिकार दिले. या संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आहेत. म्हणूनच त्यांच्या प्रतीची कृतज्ञता कायम राहावी यासाठी मी नमस्कार केल्यानंतर जयभीम आवर्जुन म्हणते असे चिन्मयी सुमित यांनी म्हटले आहे.
लोक विचारतात की तुम्ही जयभीमवाल्या आहात का?
काही दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यात अखिल भारतीय जनवादी संघटनेच्या वतीने 13 व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनात त्या बोलत होत्या. मी नमस्कार म्हटल्यानंतर लगेचच जयभीम बोलते. त्यामुळे मला खूप लोक विचारतात की तुम्ही जयभीमवाल्या आहात का? तुम्ही त्यांच्यातल्या आहात का? असे विचारले जाते. या लोकांना मला सांगायचंय की होय मी त्यांच्यातली आहे. म्हणजेच मी डॉ. बाबासाहेब आंबडकरांची आहे, असे थेट भाष्य चिन्मयी सुमित यांनी केले.
म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांबाबतची कृतज्ञता…
यासह लोकांना अनेक नेते, महापुरुष आवडतात. तशीच मी आंबेडकरांची चाहती आहे, असे सांगत भारतातील प्रत्येक भगिनीला जयभीम म्हणावं वाटलं पाहिजे अशी अपेक्षाही त्यांना व्यक्त केली. आपण सर्व महिला जनवादी महिला संघटनेच्या कार्यकर्त्या, कॉम्रेड आहात. सर्व महिलांना राज्यघटनेने माणसाचा दर्जा दिला. या राज्यघटनेचे घटनाकार बाबासाहेब आंबेडकर आहेत. म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांबाबतची कृतज्ञता माझ्या प्रत्येक नमस्कारानंतर व्यक्त व्हावी, असे मला वाटते. त्यामुळेच मी जयभीम म्हणते, असेही चिन्मयी सुमित म्हणाल्या.
कोण आहेत चिन्मयी सुमित?
चिन्मयी सुमित या सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आणि कसलेल्या अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक प्रसिद्ध चित्रपटांत, मालिकांत काम केलेले आहे. फास्टर फेणे, हृदयनाथ, फुलवंती, मुरांबा, पोरबाजार यासारख्या गाजलेल्या चित्रपटांत त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारलेली आहे. यासह अनेक मालिकांतही त्यांनी केलेल्या कामाची फार प्रशंसा झालेली आहे. प्रेमा तुझा रंग कसा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बन मस्का अशा प्रसिद्ध मालिकांत त्यांनी काम केलेले आहे.
