Big Boss OTT 2 : सलमान खानच्या शोमध्ये आदित्य नारायण करणार एंट्री ? अखेर काय म्हणाला तो…?
गायक आदित्य नारायण बिग बॉस ओटीटी 2 मध्ये सहभागी होणार आहे, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यावर अखेर गायकाने मौन सोडले आहे.

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक उदित नारायण (udit narayan) यांचा मुलगा आणि गायक आदित्य नारायण (aditya narayan) याच्याबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. आदित्य हा बिग बॉस ओटीटी 2 (Big Boss OTT 2) मध्ये दिसणार आहे, अशी चर्चा काही दिवसांपासून जोर धरू लागली होती. मात्र, त्यावेळी गायकातर्फे कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती.
पण आता आदित्यने या शो संदर्भात त्याचे मौन सोडले आहे आणि तो सलमान खानच्या या शोमध्ये जाणार आहे की नाही याबाबत खरं-खरं उत्तर दिलं आहे. तो काय म्हणाला हे जाणून घेऊया.
आदित्यने काय सांगितलं ?
सोशल मीडियाद्वारे आदित्य नारायणने ‘बिग बॉस ओटीटी 2’ च्या एंट्रीसंदर्भात घोषणा केली आहे. आपण या शोमध्ये सहभागी होणार नाही, असे आदित्यने स्पष्ट केले आहे. अभिनेता व गायक असलेल्या आदित्य म्हणाला की, खतरों के खिलाडी हाच त्याचा पहिला आणि शेवटचा रिॲलिटी शो आहे. ‘आपण एकदाच आयुष्यभराचा अनुभव घेतला आहे, आणि तो उत्तम होता ‘, असेही आदित्यने नमूद केले आहे. त्याच्या या वक्तव्यावरून एक गोष्ट तर निश्चितपणे स्पष्ट होते की, आदित्य बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी होणार नाहीये.

बिग बॉस ओटीटी 2 मधील स्पर्धक कोण ?
‘बिग बॉस ओटीटी 2’ मधील स्पर्धकांबद्दल सध्या अनेक चर्चा सुरू आहेत. फहमान खान, उमर रियाज, काजीव सेन, पूजा गौर, संभावना सेठ, अंजलि अरोरा, मुनव्वर फारुखी आणि अनेक जण यात सहभागी होतील, अशी अटकळ बांधली जात आहे. मात्र मेकर्स किंवा सेलिब्रिटी यांपैकी कोणीही ते शोमध्ये सहभागी होणार आहेत की नाही याबाबत अद्याप कोणताही दुजोरा दिलेला नाही.
टीव्ही प्रमाणेच बिग बॉस ओटीटीचे सूत्रसंचालनही सलमान खान हाच करणार असल्याचे समजते. रफ्तार सोबत याचा पहिला प्रोमो रिलीज होणार असल्याचे वृत्त आहे. मात्र हा शो ऑन एअर कधी जाईल, याबद्दल मेकर्सनी अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही.
