चाकूहल्ल्यानंतर सैफ अली खानच्या सुरक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय
अभिनेता सैफ अली खानवरील चाकूहल्ल्यानंतर त्याच्या सुरक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सैफच्या जुन्या इमारतीची सुरक्षा भिंत वाढवण्यात आली असून त्यावर लोखंडी जाळीसुद्धा बसवण्यात आली आहे.

अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारी रोजी त्याच्या वांद्रे इथल्या राहत्या घरात एका चोराने चाकूहल्ला केला. चोराने सैफवर सहा वार केले, त्यापैकी दोन वार गंभीर होते. या घटनेनं कलाविश्वात खळबळ उडाली. सैफवरील हल्ल्यानंतर आता त्याच्या जुन्या ‘फॉर्च्युन हाइट’ या इमारतीची सुरक्षा भिंत वाढवण्यात येत आहे. फॉर्च्युन हाइट्स इमारतीच्या सुरक्षा भिंतीवर अतिरिक्त लोखंडी जाळी बसवली जात आहे. अशीच जाळी संपूर्ण इमारतीच्या सुरक्षा भिंतीवर लावण्यात येणार आहे. फॉर्च्युन हाइट्समध्ये इतर इमारतीतून कोणीही प्रवेश करू नये, यासाठी इमारतीच्या सुरक्षा भिंतीवर लोखंडी जाळी बसवण्याचं काम सुरू आहे.
सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी ‘सतगुरु शरण’ या इमारतीची सुरक्षा भिंत ओलांडून त्याच्या घरात घुसला होता. त्यामुळे आता खबरदारीचा आणि सुरक्षेचा उपाय म्हणून सैफच्या जुन्या घराच्या इमारतीची सुरक्षा भिंतसुद्धा वाढवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर या इमारतीचा सुरक्षारक्षकही बदलण्यात आला आहे. बंद असलेले सिसिटीव्ही कॅमेरे सुरू करण्यात आले आहेत. फॉर्च्युन हाइट्स या इमारतीत सैफचं ऑफिस आणि घर आहे. सतगुरु शरणमध्ये राहण्यापूर्वी सैफ फॉर्च्युन हाइट्स या इमारतीत राहायचा.
16 जानेवारी रोजी रात्री दोन वाजता आरोपी सैफच्या घरात शिरला आणि त्याने अभिनेत्यावर चाकूहल्ला केला होता. आरोपीने सैफवर सहा वार केले होते. त्यापैकी दोन वार खोलवर झाले होते. यानंतर सैफला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सैफची प्रकृती आता ठीक असून त्याला 21 जानेवारी रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.
नेमकं काय घडलं होतं?
चोरीच्या उद्देशाने आरोपी सैफचा छोटा मुलगा जहांगीरच्या खोलीस शिरला होता. त्या खोलीत दोन महिला कर्मचारी झोपल्या होत्या. यातील एक महिला कर्मचाऱ्याला त्याने आधी शांत राहण्यास सांगून धमकावलं होतं. तसंच एक कोटी रुपये मागितले. त्यावेळी लिमा या सैफच्या लहान मुलाला उचलण्यासाठी गेल्या असता आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी सैफ अली खान आणि करीना कपूर दोघंही तिथे पोहोचले. त्यावेळी हल्लेखोराने हेक्सा ब्लेडसारख्या चाकून सैफवर हल्ला केला. तैमुरची आया गीता यादेखील मधे पडल्याने जमखी झाल्या होत्या.
