मराठी कलाकारांची मुंबई लोकलमध्ये अनोखी रंगपंचमी; पहा व्हिडीओ
मराठी कलाकारांनी मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये अनोखी धुळवड साजरी केली आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऐश्वर्या नारकर, सुरुची अडारकर, तितिक्षा तावडे या व्हिडीओमध्ये एकमेकींना अनोखा रंग लावताना दिसत आहेत.

सध्या देशभरात धुळवडीची धूम पहायला मिळतेय. होलिका दहन केल्यानंतर एकमेकांना रंग लावून रंगपंचमी साजरी केली जात आहे. अशातच मराठी कलाकारसुद्धा अनोख्या पद्धतीने रंगांची उधळण करताना दिसले. या कलाकारांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, तितिक्षा तावडे, सुरूची अडारकर आणि एकता डांगर हे सर्व मिळून मुंबई लोकल ट्रेनमध्ये रंगपंचमी साजरा करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यावेळी ते एकमेकांच्या गालाला गुलाल नाही तर मेकअपमध्ये वापरला जाणारा ‘ब्लश’ लावताना दिसत आहेत. या व्हिडीओवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
‘होली है सखियाँ’ असं कॅप्शन देत सुरुची अडारकरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये सुरुवातील ऐश्वर्या नारकर आणि तितिक्षा तावडे या दोघी एकमेकींच्या गालावर ब्लश हाच गुलाल समजून लावताना दिसत आहेत. त्यानंतर सुरुची आणि एकता एकमेकींच्या गालावर आणि नाकावर तोच ब्लश लावतात. या व्हिडीओच्या अखेरीस चौघी मिळून तोच ब्लश गालावर पसरवताना दिसत आहेत. मराठी कलाकारांच्या या अनोख्या धुळवडीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.




View this post on Instagram
ऐश्वर्या नारकर, तितिक्षा तावडे, सुरुची अडारकर आणि एकता डांगर या चौघींनी झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत काम केलंय. मालिकेचं शूटिंग संपल्यानंतर लोकलने घरी जाताना त्यांनी ही धमाल केली. ऐश्वर्या नारकर या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांचे विविध फोटो आणि रील्स तुफान व्हायरल होतात. सेटवरसुद्धा चौघींची धमाल-मस्ती पहायला मिळते.
तर दुसरीकडे तितीक्षाने बऱ्याच मालिका आणि काही चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. क्रिकेटर मिताली राजच्या आयुष्यावर आधारित ‘शाब्बाश मिठू’ या चित्रपटातही तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून तिला अधिक लोकप्रियता मिळाली आहे. सोशल मीडियावरही ती बऱ्यापैकी सक्रिय असते. सुरुची अडारकरने ‘का रे दुरावा’ या मालिकेत भूमिका साकारली होती.