याला म्हणतात संस्कार..; ऐश्वर्याच्या लेकीच्या कृतीने जिंकली नेटकऱ्यांची मनं

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि तिची मुलगी आराध्या बच्चन यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील आराध्याच्या कृतीने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. आराध्यासह ऐश्वर्या एका पुरस्कार सोहळ्यात पोहोचली होती.

याला म्हणतात संस्कार..; ऐश्वर्याच्या लेकीच्या कृतीने जिंकली नेटकऱ्यांची मनं
Aishwarya and Aaradhya Bachchan
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 19, 2024 | 12:02 PM

अभिनेत्री ऐश्वर्या रायने नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात (SIIMA) हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यात ऐश्वर्याला मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियिन सेल्वन 2’ या चित्रपटातील दमदार भूमिकेसाठी मुख्य अभिनेत्रीचा (क्रिटिक्स) पुरस्कार मिळाला. या पुरस्कार सोहळ्यात ऐश्वर्या तिची मुलगी आराध्यासोबत पोहोचली होती. ऐश्वर्या आणि आराध्याचे बरेच फोटो-व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी आराध्याच्या एका व्हिडीओने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी तिचं तोंडभरून कौतुक करत आहेत.

या व्हिडीओत पहायला मिळतंय की दाक्षिणात्य अभिनेता चियान विक्रम हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर ऐश्वर्याला मंचावरून खाली उतरण्यासाठी मदत करतोय. मंचावरून खाली उतरल्यानंतर आराध्या तिच्या आईकडे धावत जाऊन मिठी मारते. आईला इतका मोठा पुरस्कार मिळाल्याबद्दल तिचा आनंद गगनात मावेनासा होतो. या व्हिडीओत मायलेकींच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट पहायला मिळतोय. त्यानंतर जेव्हा दोघी त्यांच्या जागेवर बसायला जातात, तेव्हा दाक्षिणात्य अभिनेता पुनीत राजकुमारचा भाऊ आणि कन्नड सुपरस्टार शिवा राजकुमार ऐश्वर्याला शुभेच्छा देण्यासाठी येतात.

पहा व्हिडीओ

ऐश्वर्याला शुभेच्छा दिल्यानंतर ती आराध्याची त्याच्याशी ओळख करून देते. तेव्हा आराध्यासुद्धा हात जोडून आधी त्यांना नमस्कार करते आणि त्यानंतर आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या पायांना स्पर्श करते. मुलीचा हा नम्रपणा पाहून ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरही अभिमानाचे भाव दिसतात. तर आराध्याचे संस्कार पाहून नेटकरीसुद्धा तिचं कौतुक करत आहेत. ‘हे सूर्यवंशमचे संस्कार आहेत’, असं एकाने लिहिलंय. तर ‘याला म्हणतात संस्कार’, असं दुसऱ्याने म्हटलंय.

ऐश्वर्याने मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियिन सेल्वन’ आणि ‘पोन्नियिन सेल्वन 2’ या दोन्ही चित्रपटांतून दमदार कमबॅक केलं. या दोन्ही चित्रपटांमधील तिच्या अभिनयकौशल्याचं प्रेक्षक-समिक्षकांकडून जोरदार कौतुक झालं होतं. म्हणूनच सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही तिच्या नावे झाला. या पुरस्कार सोहळ्यात आराध्याने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. आईला ट्रॉफी स्वीकारताना आणि मंचावरून प्रेक्षकांना संबोधताना पाहून आराध्या खूप खुश झाली होती.