जया बच्चन यांनी चित्रपटाची खिल्ली उडवल्यानंतर अक्षय थेट म्हणाला, “कोणी मूर्खच असं..”

टॉयलेट: एक प्रेम कथा हे काही नाव आहे का? असं शीर्षक असतं का? असा सवाल करत ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी अक्षय कुमारच्या चित्रपटाची खिल्ली उडवली होती. त्यावर आता अक्षय कुमारने प्रतिक्रिया दिली आहे.

जया बच्चन यांनी चित्रपटाची खिल्ली उडवल्यानंतर अक्षय थेट म्हणाला, कोणी मूर्खच असं..
Akshay Kumar and Jaya Bachchan
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 11, 2025 | 2:55 PM

अभिनेता अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. उघड्यावर शौचालयाला जाण्याच्या समस्येवर आणि घरोघरी शौचालय बांधण्याविषयीच्या जागरुकतेवर भाष्य करणारा हा चित्रपट होता. सामाजिक संदेश देणाऱ्या या चित्रपटाचं अनेकांकडून कौतुक झालं होतं. परंतु ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांना मात्र चित्रपटाच्या नावातंच समस्या जाणवली होती. “आता तुम्ही नावंच पहा कसं आहे, मी स्वत: असा चित्रपट कधी पहायला जाणार नाही. टॉयलेट: एक प्रेम कथा हे काही नाव आहे का? असं शीर्षक असतं का,” असं म्हणत त्यांनी अक्षयच्या चित्रपटाची खिल्ली उडवली होती. त्यावर आता अक्षयने प्रतिक्रिया दिली आहे.

‘केसरी 2’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अक्षयला त्याच्या चित्रपटां निवडीवरून होणाऱ्या ट्रोलिंगविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला, “मला वाटत नाही की कोणी त्यावर टीका करत असेल. अशा चित्रपटांवर टीका करणारा कोणीतरी मूर्खच असेल. पॅडमॅन, टॉयलेट: एक प्रेम कथा, एअरलिफ्ट, केसरी यांसारखे बरेच चांगले चित्रपट मी केले आहेत. त्यामुळे अशा चित्रपटांवर टीका करणारी व्यक्ती मूर्खच असेल. मी अत्यंत मनापासून हे चित्रपट बनवले आहेत. या चित्रपटांमधून लोकांना बरेच संदेश मिळतात, बऱ्याच गोष्टी समजावून सांगितल्या जातात.” अक्षयच्या या उत्तरानंतर त्याला जया बच्चन यांनी केलेल्या वक्तव्याची आठवण करून दिली. त्यावर तो पुढे म्हणतो, “आता तर त्यांनी असं म्हटलं असेल तर योग्य असेल, मला माहीत नाही. असे चित्रपट बनवून जर मी काही चुकीचं काम केलं असेन, असं त्यांचं म्हणणं असेल तर त्या ठीकच म्हणत असतील.”

काय म्हणाल्या होत्या जया बच्चन?

इंडिया टीव्हीच्या कॉन्क्लेव्हमध्ये जया बच्चन यांना ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ या सरकारी मोहिमेवरील आधारित चित्रपटाबाबतत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्या म्हणाल्या होत्या, “आता तुम्ही नावंच पहा कसं आहे, मी स्वत: असा चित्रपट कधी पहायला जाणार नाही. टॉयलेट: एक प्रेम कथा हे काही नाव आहे का? असं शीर्षक असतं का?” इतकंच नव्हे तर त्यांनी अक्षय कुमारच्या या चित्रपटाला फ्लॉप असंही म्हटलं होतं. असं विचित्र शीर्षक असलेला चित्रपट तुम्ही पहायला जाणार का, असा सवाल त्यांनी उपस्थितांना विचारला होता. त्यानंतर प्रेक्षकांमधून काहींनी हात उंचावल्यावर जया म्हणाल्या, “इतक्या लोकांमधून फक्त चार जणांना हा चित्रपट पाहावासा वाटतोय. हे खूप दु:खद आहे. हा तर फ्लॉप चित्रपट आहे.”