या चित्रपटातील काजोलची भूमिका पाहिली अन् बिग बी चिडले; दिग्दर्शकाला फोनवर चांगलंच सुनावलं
एका चित्रपटातील काजोलची भूमिका पाहून अमिताभ बच्चन फार चिडले होते. त्यांना ती भूमिका आवडली नव्हती. त्यांनी थेट दिग्दर्शकाला फोनवर चांगलंच सुनावलं होतं. पण शेवटी तोच चित्रपट सुपरहिट ठरला

अभिनेते अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे शेहनशाह म्हणतात. त्यांना जर कोणाचं काम आवडलं तर ते त्या कलाकारांना पत्र पाठवून, फुलांचा बुके पाठवून शुभेच्छा आवर्जून शुभेच्छा देतात, त्यांचं कौतुक करतात. पण त्यांनी एका चित्रपटातील काजोलची भूमिका पाहिली आणि चिडले. खरंतर हा चित्रपट हिट झाला पण त्यातील काजोलला दिलेली भूमिका त्यांना आवडली नाही. त्यांनी रागात दिग्दर्शकाला फोनवर चांगलंच सुनावलं होतं. हा किस्सा त्या दिग्दर्शकानेच एका मुलाखतीत सांगितला होता.
अमिताभ बच्चन यांच्याकडून फटकार सहन करावे लागले होते
हा चित्रपट म्हणजे 4 जुलै 1997 रोजी प्रदर्शित झालेला बॉबी देओल आणि काजोलचा ‘गुप्त’ चित्रपट. हा चित्रपट हिट झाला होता. या चित्रपटासाठी कलाकारांना अनेक पुरस्कार मिळाले. सर्वात मोठ्या नकारात्मक भूमिकेत प्रमुख नायिका काजोल पाहणे प्रेक्षकांसाठी नवीनच होते. चित्रपटात मनीषा कोइराला दुसऱ्या मुख्य भूमिकेत दिसली होती. चित्रपटाची कथा अद्भुत होती. पण या चित्रपटात काजोलला किलर म्हणून दाखवल्याबद्दल दिग्दर्शक राजीव राय यांना अमिताभ बच्चन यांच्याकडून फटकार सहन करावे लागले होते.
“राजीव, तू जे केले आहेस….”
अलीकडेच, एका मुलाखतीत राजीव राय यांनी ही रंजक गोष्ट उघड केली. त्यांनी सांगितले की चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी चेन्नईमध्ये एक ट्रायल शो आयोजित करण्यात आला होता, जिथे अमिताभ बच्चन यांनी ‘गुप्त’ पाहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी राजीवला फोन केला आणि म्हणाले, “राजीव, तू जे केले आहेस त्याबद्दल तुला खात्री आहे का? तू काजोलला किलर बनवलेस, तुला खात्री आहे की हे काम करेल?” राजीव हसत म्हणाले, “मला फटकारण्यात आले. ते वरिष्ठ आहेत, ते फटकारू शकतात.” त्यावर राजीवने त्याला उत्तर दिले, “सर, मला तुमच्या प्रश्नांची उत्तरे माहित नाहीत. फक्त दोन दिवस वाट पाहा. जनता शुक्रवारी उत्तर देईलच.” आणि जनतेने जोरदार उत्तर दिले! ‘गुप्त’ हा चित्रपट सुपरहिट झाला आणि आजही तो काजोलच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय कामगिरीसाठी मानला जातो.
अमिताभऐवजी सुनील शेट्टी हिरो बनले
राजीव यांनी पुढे सांगितले की त्यांनी 90 च्या दशकाच्या सुरुवातीला अमिताभ बच्चनसाठी एक अद्भुत पटकथा तयार केली होती. त्यांनी ती दिग्दर्शक अनीस बज्मी यांच्यासोबत लिहिली आणि स्वतः अमिताभ यांना भेटून त्यांना ती कथा सांगितली. पण त्यावेळी अमिताभ यांचे करिअर कठीण काळातून जात होते. राजीव म्हणाले, “त्यांनी सांगितले की, ‘मी सध्या ज्या काळातून जात आहे त्या काळात मला कोणताही चित्रपट करायचा नाही.'” या उत्तराने राजीव खूप दुखावले. “मी खूप मेहनत केली होती. मला खूप वाईट वाटले, पण मी अमितजींना नाही तर नशिबाला दोष दिला.”
त्यानंतर राजीवने एक नवीन निर्णय घेतला आणि सुनील शेट्टीसोबत ‘मोहरा’ बनवला जो ब्लॉकबस्टर ठरला. नंतर ‘गुप्त’ देखील बनवण्यात आला आणि प्रेक्षकांनी त्यावरही खूप प्रेम केलं. याशिवाय त्यांनी अनेक उत्तम चित्रपट बनवले.
