Jarann movie review: कसा आहे अमृता सुभाष-अनिता दातेचा ‘जारण’ सिनेमा? वाचा रिव्ह्यू
Jarann Marathi movie review: 'जारण' हा मराठी सिनेमा सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या सिनेमाची कथा नेमकी काय आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...

सध्या सगळीकडे ऋषिकेश गुप्ते दिग्दर्शित ‘जारण’ सिनेमा चर्चेत आहे. या चित्रपटात काळी जादू दाखवण्यात आली आहे. ‘जारण’ या एक भयानक आणि थ्रिलर सिनेमात अमृता सुभाष, अनिता दाते केलकर, किशोर कदम, अवनी जोशी हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच सिनेमाची चर्चा सुरु होती. आता सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमाची कथा नेमकी काय आहे? असा प्रश्न पडला आहे. चला जाणून घेऊया…
काय आहे सिनेमाची कथा?
‘जारण’ सिनेमाची कथा एका छोट्या गावातील आहे. या गावात एक घर प्रसिद्ध आहे. या घरातील वरच्या मजल्यावर एक स्त्री भाड्याने राहत होती. गावकऱ्यांचे म्हणणे होते की ती स्त्री माणूस नसून चेटकीण आहे. ती एक दिवस संपूर्ण गावाचा नाश करेल. जेव्हा गावकरी एकत्र येऊन त्या स्त्रीला गावातून हाकलण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ती त्या घरातील एका लहान मुलीला जवळ बोलावून तिच्यावर जादू-टोणा करते. गावकऱ्यांना सांगते की आता या मुलीचं आणि संपूर्ण गावाचं केवळ वाईटच होईल.
ती लहान मुलगी आता मोठी झाली आहे. चेटकीण गाव सोडताना जे बोलली होती, तसेच काही त्या मुलीच्या आयुष्यात घडताना दिसते. एका कार अपघातानंतर तिची मानसिक स्थिती पूर्णपणे बिघडते. तिच्या आयुष्यात गोंधळ तेव्हा निर्माण होतो, जेव्हा तिला तिच्याच घरात सामान्य माणसालाही दिसत नाही अशा गोष्टी दिसू लागतात. तिला एक लहान मुलगी देखील आहे. त्या मुलीला एक खेळणे (बाहुली) मिळते. हे खेळणे त्या चेटकीणीचेच आहे जिला गावकऱ्यांनी हाकलून लावले होते.
वाचा: संजय कपूरचे पार्थिव शरीर कुठे आहे? 6 दिवसांनंतरही अंत्यसंस्कार झाले नाहीत, कुटुंबही गप्प
चित्रपटातील एका दृश्यात दाखवले आहे की, घराच्या दाराबाहेर तिचा पती उभा आहे आणि तो आपल्या मुलीला घेऊन जाण्यासाठी आला आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे तिचा पती त्या कार अपघातात मरण पावला आहे. या सगळ्यातून ही महिला कशी बाहेर पडते? शेवट नेमका कसा होता? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागणार आहे.
चित्रपटाचा रिव्ह्यू
‘जारण’ हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील एक अनोखा प्रयोग आहे. काळ्या जादूवर आधारित ही कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवते. दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते यांनी भय आणि मानसिक गोंधळ यांचे मिश्रण अतिशय प्रभावीपणे सादर केले आहे. अमृता सुभाषचा अभिनय चित्रपटाचा आत्मा आहे. त्यांनी भय, संभ्रम आणि असहायता यांचे भाव चेहऱ्यावर उत्कृष्टपणे आणले आहेत. किशोर कदम आणि अनिता दाते केळकरचीही भूमिका लक्षवेधी आहेत.
चित्रपटाची कथा साधी वाटत असली तरी ती खूप खोल आहे. ती प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडते आणि शेवटापर्यंत उत्सुकता कायम ठेवते. विशेषतः, बाहुलीच्या भोवती फिरणारी रहस्ये आणि गावकऱ्यांच्या अंधश्रद्धेचे चित्रण खूपच प्रभावी आहे. सिनेमॅटोग्राफी आणि पार्श्वसंगीत चित्रपटाला अधिक भयानक बनवते, पण काही ठिकाणी VFX ची कमतरता खटकते.
चित्रपटाच्या जमेची बाजू?
- अमृता सुभाषचा दमदार अभिनय आणि कथेची पकड.
- शेवटातील अनपेक्षित ट्विस्ट्स.
- गावातील अंधश्रद्धा आणि काळ्या जादूच्या थीमचे उत्कृष्ट सादरीकरण.
काय सुधारले जाऊ शकते?
- VFX आणि स्पेशल इफेक्ट्सवर अधिक काम केले असते तर चित्रपटाचा प्रभाव आणखी वाढला असता.
- बालपणीच्या दृश्यांना थोडा अधिक वेळ दिला असता तर कथेला अधिक खोली मिळाली असती.
एकंदरीत ‘जारण’ हा चित्रपट भयपट आणि मानसिक थ्रिलरप्रेमींसाठी एक उत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला वेगळ्या धाटणीचा मराठी चित्रपट पाहण्याची इच्छा असेल, तर हा चित्रपट नक्कीच पाहावा.
