तू खरंच मैत्रीण होतीस का गं? प्रिया मराठेच्या निधनानंतर अंकिता लोखंडेवर का भडकले नेटकरी?
अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर अंकिता लोखंडेनं सोशल मीडियावर एकही पोस्ट किंवा स्टोरी न लिहिल्याने नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अंकिता सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. परंतु प्रियाबद्दल तिने काहीच का लिहिलं नाही, असा सवाल अनेकांनी केला आहे.

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत अभिनेत्री अंकिता लोखंडेची ऑनस्क्रीन बहीण साकारणारी अभिनेत्री प्रिया मराठेचं रविवारी 31 ऑगस्ट रोजी निधन झालं. गेल्या काही वर्षांपासून प्रिया कर्करोगाशी झुंज देत होती. अखेर तिची ही झुंज अपयशी ठरली. वयाच्या 38 व्या वर्षी तिने अखेरचा निरोप घेतला. प्रियाच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. तर काहींनी प्रियाच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन तिला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. परंतु या सर्वांत ‘पवित्र रिश्ता’मध्ये प्रियाच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे मात्र कुठेच नव्हती. इन्स्टाग्रामवर क्षणोक्षणीचे अपडेट्स टाकणाऱ्या अंकिताने प्रियासाठी एकही पोस्ट लिहिली होती. यावरूनच नेटकरी तिच्यावर भडकले आहेत. अंकिताच्या फोटोंवर कमेंट्स करत नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला आहे.
‘तुझ्यापर्यंत प्रिया मराठेच्या निधनाची बातमी आली नसेल का? तिच्याविषयी एक तरी पोस्ट टाकायला हवं होतं. तू खरंच मैत्रीण होतीस का गं? की फक्त नावाला माणसं आजूबाजूला असतात तुझ्या? मला तू खूप आवडायची, पण आज का कोणास ठाऊक मला तुझं वागणं खटकलंय. तू तिला शेवटचं भेटायला जायला पाहिजे होतं. तिने तुझ्यासोबत काम केलं होतं. उषा नाडकर्णी यांनीही तिच्याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. तू मराठी व्यक्ती नाहीस’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रिया मराठेविषयी एकही पोस्ट किंवा स्टोरी का लिहिली नाही, असा सवाल काहींनी केला आहे.

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत अंकिताने अर्चना या मराठी मुलीची भूमिका साकारली होती. तर प्रिया या मालिकेत तिची छोटी बहीण वर्षाच्या भूमिकेत होती. अभिनेत्री प्रार्थना बेहेरेसुद्धा या मालिकेत काम करत होती. प्रार्थना प्रियाच्या अंत्यदर्शनाला पोहोचली होती. आपल्या खास मैत्रिणीला अखेरचा निरोप देताना तिला अश्रू अनावर झाले होते. तर ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णीसुद्धा माध्यमांसमोर प्रियाबद्दल बोलताना भावूक झाल्या होत्या.
अभिनेता अभिजीत खांडकेकर, अभिजीत केळकर, ओमप्रकाश शिंदे, सुयश टिळक, आस्ताद काळे, अभिनेत्री शाल्मली टोळ्ये, स्वप्नाली पाटील, प्रार्थना बेहेरे, जुई गडकरी, समिधा गुरू, मंगल केंकरे, शर्मिला शिंदे या कलाकारांनी प्रियाच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. मीरा रोड इथल्या मुक्तिधाम स्मशानभूमीत प्रिया मराठेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
