रंगपंचमीच्या एक दिवस आधी भाग्यश्रीला दुखापत; कपाळावर 13 टाके
'मैंने प्यार किया' या चित्रपटात भूमिका साकारलेली अभिनेत्री भाग्यश्रीसोबत रंगपंचमीच्या एक दिवस आधी वाईट घडलं. तिच्या कपाळावर दुखापत झाली असून 13 टाके पडले आहेत. रुग्णालयातील भाग्यश्रीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री भाग्यश्रीसोबत रंगपंचमीच्या एक दिवस आधी मोठी घटना घडली आहे. भाग्यश्रीच्या कपाळाला दुखापत झाली असून तिला 13 टाके घालण्यात आले आहेत. एका खेळादरम्यान तिला ही दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. भाग्यश्रीचे रुग्णालयाती काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये भाग्यश्री रुग्णालयातील बेडवर झोपलेली दिसून येत आहे. तर तिच्या दुखापतीवर डॉक्टर उपचार करत आहेत. भाग्यश्रीला पिकलबॉल खेळताना कपाळावर ही दुखापत झाली आहे. उपचारानंतर तिने एक सेल्फीसुद्धा क्लिक केला असून तोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पिकलबॉल हा टेनिस, बॅडमिंटन आणि टेबल टेनिस यांसारखाच खेळाचा एक प्रकार आहे. लहान पॅडल आणि प्लास्टिक बॉलने हा खेळ खेळला जातो. याच खेळादरम्यान भाग्यश्रीच्या कपाळावर ही दुखापत झाली आहे. त्यानंतर तिच्या कपाळावर 13 टाके घालण्यात आले आहेत. पापाराझी अकाऊंटवरून भाग्यश्रीचे रुग्णालयातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
भाग्यश्रीने 1989 मध्ये ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यामध्ये तिची आणि सलमान खानची जोडी तुफान हिट ठरली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजला होता. मात्र या चित्रपटानंतर लगेचच तिने हिमालय दासानीशी लग्न केलं. 1990 मध्ये या दोघांचा लग्नसोहळा पार पडला. लग्नानंतर भाग्यश्रीने कामातून पूर्णपणे ब्रेक घेतला. या दोघांना अभिमन्यू आणि अवंतिका ही दोन मुलं आहेत. हे दोघंही अभिनयक्षेत्रात कार्यरत आहेत.
View this post on Instagram
भाग्यश्रीचा जन्म महाराष्ट्रातील सांगली इथल्या मराठी कुटुंबात झाला. तिने 1987 मध्ये ‘कच्ची धूप’ या मालिकेतून अभिनयक्षेत्रातील करिअरची सुरुवात केली होती. मात्र सूरज बडजात्या दिग्दर्शित ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कारदेखील मिळाला होता. हिंदीसोबत तिने तेलुगू, तमिळ आणि कन्नड या भाषांमधील चित्रपटांमध्येही काम केलंय.