
मुंबईत पावसाने अक्षरश: कहर केला आहे. याचा परिणाम फक्त रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरच झाला नाही, तर त्यामुळे सर्वसामान्यांचं जनजीवनही विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलंय आणि कधीही न थांबणाऱ्या या मुंबईची गतीही आज (मंगळवार) थांबली आहे. पावसाचा फटका काही चित्रपट, मालिका आणि शोजच्या शूटिंगवरही झाला आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतिष्ठित ‘बिग बॉस 19’चं शूटिंग रखडलं आहे. ‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, बिग बॉसचं घर आज म्हणजेच मंगळवारी माध्यमांसाठी उघडलं जाणार होतं. या घराची पहिली झलक माध्यमांना दाखवली जाणार होती. परंतु शहरातील अनेक भागात पाणी साचल्यामुळे जिओ हॉटस्टार टीमने हा आजचा कार्यक्रम रद्द केला.
‘शहरातील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय. त्यामुळे बिग बॉसच्या घराचा दौरा आणि त्यासंबंधित सर्व उपक्रमांवर सध्या स्थगिती आणली आहे. तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पावसाच्या परिस्थितीनुसार आम्ही तुम्हाला पुढील माहिती देऊ’, असं हॉटस्टारच्या टीमकडून स्पष्ट करण्यात आलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीहून आलेल्या पत्रकारांना वेळेवर विमानातून उतरवण्यात आलं, जेणेकरून त्यांना प्रवासात कोणताही त्रास होणार नाही. तर मुंबईत आधीच पोहोचलेल्या पत्रकारांना परत पाठवण्यात आलं, जेणेकरून ते इथं अडकून पडणार नाहीत. कारण खराब हवामानामुळे अनेक विमानांची उड्डाणे उशिरा किंवा रद्द करण्यात आली आहेत.
‘बिग बॉस 19’च्या मीडिया इव्हेंट व्यतिरिक्त, मुंबईतील इतर शूटिंगवर फारसा परिणाम झालेला नाही. जवळपास सर्व शूटिंग आवश्यक ती सावधगिरी बाळगून सुरू आहेत. फिल्म सिटीमध्येही काही ठिकाणी पाणी साचलं आहे. ‘बिग बॉस 19’चा प्रीमिअर येत्या 24 ऑगस्ट रोजी होणार आहे. या नव्या सिझनविषयी प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे. सूत्रसंचालक सलमान खानने याआधीच शोच्या राजकीय सेटअपविषयी माहिती दिली होती. आता नवीन घराची झलक लवकरच प्रेक्षकांना दाखवली जाणार आहे. परंतु त्यासाठी प्रेक्षकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस’च्या अठराव्या सिझनसाठी सुमारे 250 कोटी रुपये आकारणाऱ्या सलमानने ऑनएअरचे महिने वाढल्याने या सिझनसाठी फी देखील वाढवली आहे. ‘द सियासत डेली’ने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान ‘बिग बॉस’च्या 19 व्या सिझनसाठी सुमारे 300 कोटी रुपये फी आकारत आहे.