ही कसली भक्ती? ढोल-ताशांच्या आवाजावरून अभिनेत्रीची तक्रार; संतापलेले नेटकरी म्हणाले ‘बिहारला निघून जा..’
गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाजवल्या जाणाऱ्या ढोल-ताशांच्या आवाजामुळे त्रास होत असल्याची तक्रार या अभिनेत्रीने केली आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत तिने तिचं मत मांडलं आहे. परंतु यावरून नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे.

संपूर्ण देशभरात गणेशोत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जात आहे. परंतु गणेशोत्सवात मोठमोठ्याने वाजवली जाणारी गाणी आणि ढोल-ताशांच्या आवाजामुळे प्रचंड त्रास होत असल्याची तक्रार ‘बिग बॉस 18’ फेम अभिनेत्री कशिश कपूरने केली. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत तिने असह्य डेसिबलवर ढोल-ताशा वाजवणाऱ्या भक्तांना फटकारलं आहे. कशिशने सांगितलं की ती 20 व्या मजल्यावर राहते, तरी ढोल-ताशाचा मोठा आवाज जवळपास तीन तासांपेक्षा जास्त काळ ऐकू येत होता. इतकंच नव्हे तर अशा गोष्टींचं समर्थन करणाऱ्यांवरही तिने टीका केली.
काय म्हणाली कशिश?
“त्रास देऊन कोणती भक्ती केली जाते? आता यावरून मला शिव्या देण्यासाठी काही धर्मरक्षक आणि पुजारी माझ्या कमेंट सेक्शनमध्ये येतील. पण कृपया माझा मुद्दा समजून घ्या. मी 20 व्या मजल्यावर राहते. माझ्या घरातील सर्व दरवाजे आणि खिडक्या बंद आहेत. तरीसुद्धा खाली जो मोठमोठा आवाज केला जात आहे, जे वाजवत आहेत, ते इथे विसाव्या मजल्यावरही माझ्या डोक्यात जातंय. गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक आहे, हे मान्य आहे मला. मीसुद्धा गेली होती. विसर्जन महत्त्वाचं आहे हे मी समजू शकते, मी पण एंजॉय केलंय. परंतु तुम्ही तीन तासांपासून ढोल-ताशे वाजवत आहात. त्यामुळे माझं डोकं दुखायला लागलं आहे. आनंद साजरा करायचा असेल तर असा करा, ज्यामुळे इतरांना त्रास होणार नाही. शिव्या देण्याची गरज नाही, तर समजून घेण्याची गरज आहे”, अशा शब्दांत कशिशने तिचा मुद्दा मांडला आहे.
View this post on Instagram
कशिशच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘जर रात्री उशिरापर्यंत पार्ट्या सहन केल्या जातात, मग तीन तासांच्या भक्तीचं तू आदर करू शकत नाहीस का’, असा सवाल एकाने केला. तर ‘हा त्यांच्या भक्तीचा एक मार्ग आहे. तुला त्रास होत असेल तर तू इअरफोन्स कानात घाल किंवा गणेश चतुर्थीदरम्यान थेट मुंबईबाहेर निघून जा’, असा थेट सल्ला दुसऱ्या युजरने दिला. ‘ढोल-ताशांना कायदेशीर परवानगी आहे आणि ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. तुला त्रास होत असेल तर बिहारला निघून जा’, अशाही शब्दांत नेटकऱ्यांनी टीका केली आहे.
