करो मतदान…मोदींच्या आवाहनानंतर शाहरुखचा खास व्हिडीओ

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:12 PM, 22 Apr 2019
करो मतदान...मोदींच्या आवाहनानंतर शाहरुखचा खास व्हिडीओ

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या काळात जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बॉलिवूडच्या कलाकारांना जनजागृती करण्याचं आवाहन केलं होतं. नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याने मतदारांना जागृती करणारा एक व्हिडीओ तयार केला आहे. करो मतदान असे या व्हिडीओचे शीर्षक असून नरेंद्र मोदींनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या काळात जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बॉलिवूड कलाकारांना जनजागृती करण्याचे आवाहन केले होते. बॉलिवूड कलाकारांना तरुण पिढी सर्वात जास्त फॉलो करते, त्यामुळे बॉलिवूड कलाकारांचा तरुण पिढीवर सर्वाधिक प्रभाव असतो. त्या दृष्टीने अभिनेते अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, यांसह विविध बॉलिवूड कलाकारांना ट्विट करत तरुण पिढीला मतदान करण्यासाठी जागृत करा, असे आवाहन नरेंद्र मोदींनी केले होते.

त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत शाहरुख खानने मतदारांना जागृती करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात त्याने ”पंतप्रधानांनी हा व्हिडिओ कल्पक असावा, असे म्हटले होते. त्यामुळे माझ्याकडून हा व्हिडीओ बनवण्यास थोडा उशीर झाला…पण तुम्ही उशीर करु नका… मतदान करा. मतदान हा केवळ तुमचा हक्क नाही तर तुमची ताकदही आहे, ती दाखवा”, असे आवाहन शाहरुखने मतदारांना केले आहे. त्याने ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांनी पंतप्रधानांना ही टॅग केले आहे.

‘करो मतदान’ असे या व्हिडीओचे शीर्षक असून हा व्हिडीओ 1 मिनीटे 06 सेंकदाचा आहे. शाहरुखने तयार केलेल्या या व्हिडीओत त्याने आपल्या मताचे मोल आणि बोटावरच्या शाईचे महत्त्व सांगितले आहे. या व्हिडिओला सध्या फेसबुक ट्विटर आणि यूट्युबवर लाखो लाईक्स मिळाले आहेत.

शाहरूखने केलेल्या या व्हिडीओला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रिट्विट केले आहे. शाहरुखचे ट्विट रिट्विट करताना त्यांनी ‘एक स्तुत्य प्रयत्न’ अशा शब्दांत व्हिडीओचे कौतुक केले आहे. तसेच देशातील मतदार, त्यातही नव मतदार आपल्या आवाहनाला प्रतिसाद देतील आणि मोठ्या संख्येने मतदान करतील, याची मला खात्री असल्याचे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.