शाहरुखकडून चाहत्यांना दिवाळीची भेट; ‘पठाण’चा दमदार टीझर प्रदर्शित

शाहरुखचा 'पठाण' येतोय प्रेक्षकांच्या भेटीला; पहा टीझर

शाहरुखकडून चाहत्यांना दिवाळीची भेट; पठाणचा दमदार टीझर प्रदर्शित
पठाणचा टीझर प्रदर्शित
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 25, 2022 | 5:25 PM

मुंबई- बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खान (Shah Rukh Khan) येत्या नवीन वर्षांत तीन धमाकेदार चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच शाहरुखच्या ‘पठाण’ (Pathan) या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. जवळपास चार वर्षांनंतर शाहरुख मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2018 मध्ये त्याचा ‘झिरो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर त्याने बराच काळ चित्रपटांपासून ब्रेक घेतला. आता पठाणचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयी उत्सुकता अधिक वाढली आहे. दिवाळीनिमित्त किंग खानने त्याच्या चाहत्यांना ही भेट दिली आहे.

पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘आता प्रतीक्षा संपली.. पठाणचा टीझर रिलीज झाला’, असं कॅप्शन देत हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळ आणि तेलुगू भाषेतही प्रदर्शित होणार आहे.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठाण या चित्रपटात शाहरुखसोबतच दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही भूमिका आहेत. याआधी शाहरुख आणि दीपिकाची जोडी ‘ओम शांती ओम’ आणि ‘चेन्नई एक्स्प्रेस’मध्ये पहायला मिळाली होती. या जोडीला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.

पठाणशिवाय शाहरुखचा डंकी आणि जवान हे दोन चित्रपटदेखील प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांची शूटिंग भारतात आणि स्पेनमध्ये झाली आहे. ‘पठाण’मध्ये शाहरुखचा वेगळा लूक प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या झिरो या चित्रपटात शाहरुखसोबत अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांनी भूमिका साकारल्या होत्या. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यामुळे पठाणमधून शाहरुख दमदार कमबॅक करेल का, अशी उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे.