‘नदीम-श्रवण’ फेम श्रवण राठोड कालवश, दहा लाखांचे बिल थकल्याने पार्थिव मिळण्यास विलंब

बॉलिवूडच्या प्रसिद्ध संगीतकारद्वयी नदीम-श्रवण यांच्यापैकी श्रवण राठोड यांचे माहिममधील खासगी रुग्णालयात कोरोनावरील उपचारादरम्यान निधन झाले. (Shravan Rathod Nadeem-Shravan COVID-19 )

'नदीम-श्रवण' फेम श्रवण राठोड कालवश, दहा लाखांचे बिल थकल्याने पार्थिव मिळण्यास विलंब
संगीत दिग्दर्शक श्रवण राठोड

मुंबई : ‘चेहरा क्या देखते हो’, ‘ऐसी दिवानगी देखी नहीं कही’, ‘घुंगट की आड से’ यासारख्या नव्वदच्या दशकातील सदाबहार गाण्यांनी रसिकांच्या मनावर मोहिनी घालणाऱ्या बॉलिवूडच्या प्रसिद्ध संगीतकारद्वयी नदीम-श्रवण (Nadeem Shravan) यांच्यापैकी श्रवण राठोड (Shravan Rathod) यांचे निधन झाले. कोरोनावरील उपचार सुरु असताना मुंबईतील रुग्णालयात गुरुवारी रात्री 9.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र त्यांच्या रुग्णालयाचे दहा लाख रुपयांचे बिल थकल्याने त्यांचे पार्थिव मिळण्यास विलंब होत असल्याची माहिती आहे. (Shravan Rathod Of Music Composer Duo Nadeem-Shravan Dies Of COVID-19 Hospital Bill Pending)

हॉस्पिटलचे दहा लाखांचे बिल थकित

66 वर्षीय श्रवण राठोड हे कोरोना पॉझिटिव्ह होते. डॉक्टरांनी त्यांना आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली ठेवले होते. शेवटच्या दिवसांत ते व्हेंटिलेटरवर होते. श्रवण हे मधुमेहग्रस्त होते आणि त्यातच त्यांच्या फुफ्फुसांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे हृदयाची गती मंदावली होती. तसेच अनेक आजारांनाही डोकं वर काढलं होतं. त्यांच्या मृत्यूचे कारण ऑर्गन फेल्युअर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र ते उपचार घेत असलेल्या माहिममधील एसएल रहेजा रुग्णालयाचे सात दिवसांचे जवळपास 10 लाख रुपयांचे बिल थकित आहे. त्यामुळे श्रवण यांचा मृतदेह मिळण्यास विलंब होत आहे.

कुटुंबीयही कोरोना उपचारासाठी रुग्णालयात

बिल भरणंही गरजेचं आहे, मात्र श्रवण यांची दोन मुले (संगीतकारद्वयी संजीव-दर्शन) आणि पत्नीही इतर रुग्णालयात कोरोना उपचारासाठी दाखल आहेत. श्रवण राठोड यांचं 10 लाख रुपयांचं इन्शुरन्स आहे. मात्र त्यांचे कुटुंबीयही कोरोना पॉझिटिव्ह असल्याने एसएल रहेजा हॉस्पिटल मॅनेजमेंट आणि संबंधित विमा कंपनीसोबत बिलाच्या सेटलमेंटबाबत चर्चा सुरु आहे. फोनवरच ही बातचीत सुरु आहे.

राज्य सरकारकडे मदतीची मागणी

विम्याची रक्कम मिळाली तर रुग्णालयाचं थकित बिल भरलं जाणार आहे. त्यानंतरच श्रवण यांचं पार्थिव देण्यात येणार आहे. कोरोना काळात अनेक अडचणी असल्याने श्रवण यांचे सुपुत्र संजीव श्रवण यांनी राज्य सरकार किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या प्रकरणात मदत करण्याची विनंती केली आहे.

संबंधित बातम्या :

ज्येष्ठ बॉलिवूड संगीतकार श्रवण राठोड यांचं निधन

(Shravan Rathod Of Music Composer Duo Nadeem-Shravan Dies Of COVID-19 Hospital Bill Pending)