एक चुप, सौ सुख..; पतीकडून अत्याचारानंतर अभिनेत्रीला सासरच्यांनी दिला अजब सल्ला
अभिनेत्री दलजीत कौर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या पहिल्या लग्नातील संघर्षाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. शालीन भनोतने काहीही केलं तरी मौन बाळगून सहन कर, असा सल्ला सासरच्या मंडळींनी दिल्याचा खुलासा तिने केला.

‘इस प्यार को क्या नाम दूँ’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दलजीत कौर तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. आधी अभिनेता शालीन भनोतशी तिने लग्न केलं. या दोघांना एक मुलगा आहे. मात्र शालीन आणि त्याच्या आईवडिलांवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत तिने घटस्फोट घेतला. त्यानंतर तिने केन्या स्थित बिझनेसमन निखिल पटेलशी लग्न केलं. लग्नाच्या वर्षभरातच ती केन्याहून भारतात परतली आणि पतीवर विवाहबाह्य संबंधाचे आरोप केले. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दलजीत तिच्या संघर्षाविषयी, सामाजिक दबावाविषयी आणि आयुष्यातील समस्यांविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.
करिअरच्या शिखरावर असताना दलजीतने 2009 मध्ये शालीनशी लग्न केलं. याविषयी ती ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, “जेव्हा माझं लग्न झालं, तेव्हा मी 24-25 वर्षांची होती आणि त्यावेळी माझ्या करिअरमधील सर्वांत मोठमोठे शोज करत होती. त्यावेळी पैसा आणि प्रसिद्धीची अजिबात कमतरता नव्हती. पण लग्नानंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदललं. सासरची मंडळी मला सांगायचे की, एक चुप-सौ सुख (मौन बाळगण्यातच भलं असतं). जे काही होईल ते गप्प राहून सहन कर, असं ते सांगायचे. आमच्यासोबतही तेच घडलं, आता तुझ्यासोबतही तेच होतंय, असं ते म्हणायचे. तडजोड म्हणजे हेच असेल, असं मला त्यावेळी वाटत होतं. पण तडजोड आणि चुकीच्या गोष्टी सहन करणं यात खूप फरक असतो. तडजोड ही दोन्ही बाजूने असते पण चुकीच्या गोष्टी सहन करणं म्हणजे तुम्ही त्याला आणखी पाठिंबा देत आहात.”




View this post on Instagram
याविषयी ती पुढे म्हणाली, “जेव्हा कधी काही चुकीचं घडायचं, मी माझ्या सासू-सासऱ्यांना सांगायचे. पण ते मौनच राहिले. त्यांच्या मौनामुळे शालीनला आणखी प्रोत्साहन मिळालं. जर तुम्ही चुकीच्या गोष्टींना पाठिशी घालत राहिलात, तर समोरच्या व्यक्तीला आणखी चुका करण्याची मुभा मिळते. 2013 हे माझ्यासाठी अत्यंत भयंकर वर्ष होतं. मी त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केली होती. त्याचवेळी मी माझ्या मुलाला जन्म दिला होता. जर मी तेव्हा आवाज उठवला नसता, तर आणखी काहीतरी वाईट घडलं असतं.”
“लग्न म्हणजे तडजोड, त्यात आणि मौन.. असंच मला शिकवलं गेलं. पण मी गप्प राहिल्याने समोरचा व्यक्ती आणखी चुका करतोय, हे मला हळूहळू समजत गेलं. माझे सासू-सासरेही शालीनच्या चुकीच्या गोष्टींना पाठिशी घालत होते. वैवाहिक आयुष्यातील या तणावामुळे डिलिव्हरीच्या वेळेआधीच माझ्या बाळाचा जन्म झाला होता. मात्र आई झाल्यानंतर मी पूर्णपणे बदलले. मी मनाने आणखी खंबीर झाले”, अशा शब्दांत ती व्यक्त झाली.