8 तास शिफ्टच्या मागणीबद्दल अखेर दीपिकाने सोडलं मौन; “शांत राहून आपली लढाई..”

अभिनेत्री दीपिका पादुकोणने 8 तासांच्या शिफ्टची मागणी करताच त्यावरून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या मागणीमुळे तिला दोन चित्रपटांमधून बाहेर पडावं लागल्याचंही म्हटलं जात आहे. या सर्व चर्चांवर ती आता मोकळेपणे व्यक्त झाली.

8 तास शिफ्टच्या मागणीबद्दल अखेर दीपिकाने सोडलं मौन; शांत राहून आपली लढाई..
Deepika Padukone
Image Credit source: Instagram
Updated on: Oct 10, 2025 | 9:32 AM

अभिनेत्री दीपिका पादुकोण गेल्या काही दिवसांपासून तिच्या एका मागणीमुळे चर्चेत आली आहे. दीपिकाने इंडस्ट्रीत 8 तासांच्या शिफ्टची मागणी केली होती. त्यावर अनेक सेलिब्रिटींवर विविध मतं मांडली जात आहेत. याच मागणीमुळे तिला संदीप वांगा रेड्डीच्या ‘स्पिरीट’ आणि प्रभासच्या ‘कल्की 2898 एडी’च्या सीक्वेलमधून बाहेर पडावं लागल्याचं म्हटलं गेलं होतं. आता नुकत्याच एका कार्यक्रमात दीपिकाने त्यावर मौन सोडलं आहे. ‘जागतिक मानसिक आरोग्य दिवसा’निमित्त दीपिका मध्य प्रदेशात पोहोचली. ‘लिव्ह लव्ह लाफ’ या तिच्या फाऊंडेशनला दहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तिथे जल्लोष साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात तिला विचारण्यात आलं, “जे तुला योग्य वाटतं, त्या गोष्टींची मागणी करण्यासाठी तुला किंमत चुकवावी लागते, असं तुला कधी वाटलं का?” यावर दीपिकाने अत्यंत विचारपूर्वक उत्तर दिलं.

“मी हे अनेक पातळ्यांवर सहन केलंय. माझ्यासाठी ही काही नवीन गोष्ट नाही. मला असं वाटतं की, मानधनाच्या बाबतीही मला जे काही मिळालं, ते मला सहन करावं लागलं. या गोष्टीला काय म्हणावं ते मला समजत नाही. परंतु मी नेहमीच माझी लढाई शांतपणे आणि गुपचूप लढली आहे. कधी कधी या गोष्टी सार्वजनिक होतात, परंतु ही माझी पद्धत नाही. माझं संगोपन अशा पद्धतीने झालं नाही. परंतु, माझ्यासाठी काही गोष्टींची लढाई लढणं आणि त्याबद्दल गप्प आणि आदरपूर्वक राहणं ही माझी पद्धत आहे”, असं उत्तर दीपिकाने दिलं.

‘लिव्ह, लव्ह, लाफ’ ही दीपिकाची फाऊंडेशन देशभरात मानसिक आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. गेल्या दहा वर्षांपासून दीपिका मानसिक आरोग्य या विषयावर मोकळेपणे बोलतेय आणि त्यासाठी सामाजिक कार्य करत आहे. दीपिकाने सीएनबीसी-टीव्ही 18 ला दिलेल्या मुलाखतीत 8 तासांच्या शिफ्टचा मुद्दा उचलला होता. तिने बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या दुटप्पी भूमिकांवर टीकासुद्धा केली होती.

“जर एक महिला असल्यामुळे ही गोष्ट दबाव टाकल्यासारखी वाटत असेल, तर असंच आहे. परंतु ही गोष्ट लपलेली नाही की भारतीय फिल्म इंडस्ट्रीत अनेक सुपरस्टार, पुरुष सुपरस्टार वर्षानुवर्षे 8 तासच काम करत आहेत आणि ही गोष्ट कधीच चर्चेत आली नाही. मी आता नाव घेऊ इच्छित नाही आणि त्या गोष्टीला महत्त्वही देऊ इच्छित नाही, परंतु ही सर्वसामान्य बाब आहे. सार्वजनिकरित्या अनेक अभिनेत्यांबद्दल लोकांना माहीत आहे की ते फक्त 8 तासच काम करतात. काही जण फक्त सोमवार ते शुक्रवार 8 तास काम करतात आणि वीकेंडला काम करत नाहीत”, असं तिने म्हटलं होतं.