Deepika Padukone : दीपिका पादुकोणला हिजाबमध्ये पाहताच चाहते म्हणाले ‘आपल्या संस्कृतीचा..’
Deepika Padukone : अभिनेत्री दीपिका पादुकोणचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. यामध्ये तिने अबाया परिधान केल्याचं पहायला मिळतंय. दीपिकाच्या या व्हिडीओवर काही चाहते भडकले आहेत.

अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी नुकतंच अबू धाबीमध्ये एका जाहिरातीचं शूटिंग केलं. ही जाहिरात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. यामागचं कारण म्हणजे जाहिरातीत दिसलेला दीपिकाचा पोशाख. या व्हिडीओमध्ये दीपिकाने हिजाब घातल्याचं पहायला मिळतंय, तर रणवीरने शेरवानी परिधान केली आहे. दोघंही जाहिरातीत अबू धाबीची संस्कृती, इतिहास आणि वारसा यांचं सौंदर्य दर्शवत आहेत. तिथल्या शेख जायद ग्रँड मशिदीत दीपिका अबाया घालून फिरताना दिसतेय. तिला पहिल्यांदाच अशा लूकमध्ये पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट्स करण्यास सुरुवात केली. काहींनी तिच्या या पोशाखाचं कौतुक केलं, तर काहींनी त्यावर तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
‘दीपिका आणि रणवीर ज्या उत्साहाने आणि आनंदाने परदेशी संस्कृतीला प्रमोट करत आहेत, तेवढाच उत्साह त्यांनी भारताच्या संस्कृतीला प्रोत्साहन देण्यास दाखवला, तर बरं होईल’, असं एकाने लिहिलं. ‘महिला सक्षमीकरणाबद्दल बोलणारी दीपिका आता हिजाब घालून पर्यटनाचा प्रचार करतेय. तिचं ‘माय चॉईस’वालं विधान कुठे गेलं’, असा सवाल दुसऱ्या युजरने केला. दीपिकाने ‘वोग एम्पॉवर कॅम्पेन’अंतर्गत ‘माय चॉईस’ नावाच्या एका लघुपटात काम केलं होतं. त्यात तिने महिलांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर जोर दिला होता. या व्हिडीओवरून त्यावेळी बराच वाद झाला होता.
View this post on Instagram
काहीजण दीपिकाच्या लूकची सांस्कृतिक विविधता आणि आदराचं प्रतीक म्हणून प्रशंसा करत आहेत. तर काही जण भारतीय संस्कृतीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल तिच्यावर टीका करत आहेत. दीपिका किंवा रणवीरने या ट्रोलिंगवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. गेल्या काही दिवसांपासून दीपिका सतत सोशल मीडियावर चर्चेत आहे. याआधी तिच्या आठ तासांच्या शिफ्टच्या मागणीवरून इंडस्ट्रीत मतमतांतरे पहायला मिळाली. या मागणीमुळे दीपिकाला ‘कल्की 2898 एडी’च्या दुसऱ्या भागातून काढून टाकण्यात आल्याचीही चर्चा होती. इतकंच नव्हे तर याच वादामुळे संदीप रेड्डी वांगाच्या ‘स्पिरीट’मधूनही तिला बाहेर पडावं लागल्याचं म्हटलं गेलंय.
दीपिका आणि रणवीरने 2018 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात तिने मुलीला जन्म दिला. रणवीर आणि दीपिकाने त्यांच्या मुलीचं नाव दुआ असं ठेवलंय.
