देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; मराठी चित्रपटांसाठी अधिकाधिक चित्रपटगृहे, आधुनिक फिल्म सिटी उभारणार
महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. मराठी चित्रपटांसाठी अधिकाधिक चित्रपटगृहे उपलब्ध करून देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.

महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि मराठी चित्रपटसृष्टीची कलात्मक गुणवत्ता जपतानाच आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशी चित्रनगरी विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक सर्व आधुनिक सुविधा, तंत्रज्ञान आणि विविध प्रकारचे सेट्स एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतील. तसंच मराठी चित्रपटांसाठी अधिकाधिक चित्रपटगृहे उपलब्ध करून देण्याचा आराखडा तयार करण्यात आला असून तो लवकरच जाहीर करण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
62 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्यासह ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, अभिनेत्री हेलन खान, अभिनेत्री राणी मुखर्जी, अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक, किरण शांताराम आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवर उपस्थित होते.
कलात्मकदृष्ट्या देशातील सर्वोत्तम चित्रपटांमध्ये मराठी चित्रपटांचा समावेश होतो, असं सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आशय, वैविध्य आणि प्रयोगशीलता ही मराठी चित्रपटांची वैशिष्ट्ये आहेत. देशातील सर्वोत्तम रंगभूमी म्हणून मराठी रंगभूमीकडे पाहिलं जातं. मराठी कलावंतांनी रंगभूमीची परंपरा आणि प्रतिष्ठा आजही जपली आहे. याच समृद्ध परंपरेच्या बळावर मराठी चित्रपटसृष्टी सातत्याने पुढे जात आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पं. हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार, अभिनेता प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार, सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार आणि राणी मुखर्जीला राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. सलीम खान यांच्या वतीने अभिनेत्री हेलन यांनी जीवनगौरव पुरस्कार स्वीकारला.
पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी अखंड संगीतसेवा करत स्वतंत्र संगीतविश्व निर्माण केलं. ज्ञानेश्वर माऊली, वीर सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील त्यांच्या संगीतनिर्मितीतून मराठी संस्कृती, अध्यात्म आणि राष्ट्रभावना प्रभावीपणे व्यक्त झाली. ‘मोगरा फुलला’, ‘अरे अरे ज्ञाना झालासी पावन’, ‘रुणूझुणू रुणूझुणू रे भ्रमरा’ तसेच ‘शिवकल्याण राजा’ यांसारख्या अजरामर रचनांचा उल्लेख करून मुख्यमंत्र्यांनी पंडितजींच्या योगदानाचं कौतुक केलं.
सलीम-जावेद या जोडीने आणि सलीम खान यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला नवं वळण दिलं. ‘जंजीर’, ‘दीवार’, ‘शोले’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी प्रभावी नायक आणि अजरामर व्यक्तिरेखा निर्माण केल्या. ‘अँग्री यंग मॅन’ची संकल्पना लोकप्रिय करण्यात त्यांच्या लेखनाचा मोठा वाटा असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
