Dharmendra : धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी सनी देओलने दिली मोठी अपडेट; ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचल्या हेमा मालिनी
बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी त्यांचा मोठा मुलगा सनी देओलने महत्त्वपूर्ण अपडेट दिली आहे. धर्मेंद्र यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हेमा मालिनी त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचल्या आहेत.

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आठवडाभरापूर्वीच ते मेडिकल चेक-अपसाठी रुग्णालयात गेले होते. त्यानंतर आता पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल केल्याने चाहत्यांनी आरोग्याविषयी काळजी व्यक्त केली आहे. त्यावेळी त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती पत्नी हेमा मालिनी यांनी माध्यमांना दिली होती. सोमवारी पुन्हा प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या प्रकृतीविषयी नेमकी आणि सविस्तर माहिती अद्याप समोर आली नाही. याविषयी मुलगा सनी देओल याने कुटुंबीयांच्या खासगी आयुष्याचा आदर करण्याची विनंती माध्यमांना केली आहे.
‘धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. यापुढील माहिती आणि हेल्थ अपडेट्स जसे मिळतील तसे कळवले जातील. त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याची मी सर्वांना विनंती करतो. त्याचप्रमाणे कुटुंबीयांचं खासगीपण जपण्याचीही मी विनंती करतो’, असं सनी देओलने निवेदनात म्हटलंय. दरम्यान सोमवारी संध्याकाळी अभिनेत्री आणि धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी हेमा मालिनी ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचल्या. 89 वर्षीय धर्मेंद्र हे व्हेंटिलेटरवर असल्याचंही म्हटलं जात आहे. “आम्हाला ते लवकर बरे होण्याची आशा आहे”, अशी प्रतिक्रिया हेमा मालिनी यांनी रुग्णालयात पोहोचल्यानंतर ‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना दिली.
वयाच्या 89 व्या वर्षीही धर्मेंद्र चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. 2024 मध्ये त्यांनी ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. यामध्ये शाहिद कपूर आणि क्रिती सनॉन यांच्या मुख्य भूमिका होत्या. ते लवकरच श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘इक्कीस’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा महत्त्वपूर्ण भूमिका साकारतोय. या डिसेंबर महिन्यात धर्मेंद्र त्यांचा 90 वा वाढदिवस साजरा करणार आहेत.
याच वर्षी एप्रिल महिन्यात धर्मेंद्र यांच्या डोळ्यांची सर्जरी झाली होती. त्यांची दृष्टी कमी झाल्याने डोळ्यांच्या कॉर्निया ट्रान्सप्लांटची सर्जरी करण्यात आली होती. याशिवाय त्यांच्यावर मोतीबिंदूचीही शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हा मुंबईतील रुग्णालयाबाहेर येताना त्यांचा एक व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. “माझ्यात खूप दम आहे. अजूनही मी ठीक आहे”, असं ते पापाराझींना या व्हिडीओत म्हणताना दिसले होते.
