अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, तब्येत नाजूक; ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
दिग्गज अभिनेते धर्मेंद्र हे गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल असून त्याची प्रकृती नाजूक असल्याचं कळतंय. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. धर्मेंद्र हे व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती समोर येत आहे.

बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. धर्मेंद्र यांची तब्येत नाजूक असून ते व्हेंटिलेटरवर असल्याचं कळतंय. डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीचं सातत्याने निरीक्षण करत आहे. धर्मेंद्र यांना 31 ऑक्टोबर रोजी नियमित तपासणीसाठी रुग्णालयातत दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता ते व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आज (सोमवार) आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर शिफ्ट करण्यात आलं आहे. सध्या ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचंही समजतंय. परंतु धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांनी किंवा रुग्णालयाने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. याआधी 3 नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी त्यांच्या तब्येतीविषयी अपडेट दिली होती.
हेमा मालिनी यांना एअरपोर्टवर पापाराझींनी विचारलं होतं की, “सर्वकाही ठीक आहे का?” तेव्हा त्यांनी हाथ जोडून म्हटलं होतं की, “ठीक आहे.” धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयीही विचारणा झाली असता त्यांनी सर्वकाही ठीक असल्याचं सांगितलं होतं. याच वर्षी एप्रिल महिन्यात धर्मेंद्र यांच्या डोळ्यांची सर्जरी झाली होती. त्यांची दृष्टी कमी झाल्याने डोळ्यांच्या कॉर्निया ट्रान्सप्लांटची सर्जरी करण्यात आली होती. याशिवाय त्यांच्यावर मोतीबिंदूचीही शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हा मुंबईतील रुग्णालयाबाहेर येताना त्यांचा एक व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. “माझ्यात खूप दम आहे. अजूनही मी ठीक आहे”, असं ते पापाराझींना या व्हिडीओत म्हणताना दिसले होते.
वयाच्या 89 व्या वर्षीही धर्मेंद्र सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. अभिनयक्षेत्रातही ते सक्रिय आहेत. नुकतंच त्यांना कृती सनॉन आणि शाहिद कपूर यांच्या ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटात पाहिलं गेलं होतं. लवकरच ते ‘इक्कीस’मधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. श्रीराम राघवन दिग्दर्शित या चित्रपटात ते अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदासोबत झळकणार आहेत. हा चित्रपट येत्या 25 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय त्यांचा ‘अपने 2’ हा चित्रपटसुद्धा प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे.
धर्मेंद्र यांनी 60-70 च्या दशकात बॉलिवूडमधील आपला काळ गाजवला होता. आजही ते असंख्य जणांचे लोकप्रिय अभिनेते आहेत. वयोमानानुसार त्यांना आरोग्याच्या काही समस्यांचा सामना करावा लागतोय. ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
