‘धुरंधर 2’नंतर या नेत्याची उडवली जातेय खिल्ली; आधी स्वत:च केला दावा, आता तोंड लपवण्याची आली वेळ

'धुरंधर 2' प्रदर्शित झाल्यापासून अनेकजण गुगलवर सर्च करू लागले आहेत की नबील गबोल हा खरंच भारतीय एजंट आहे का? कारण पहिल्या भागानंतर त्याने सर्वांसमोर स्वीकार केलं होतं की जमील जमालीची भूमिका त्याच्यावर आधारित आहे.

धुरंधर 2नंतर या नेत्याची उडवली जातेय खिल्ली; आधी स्वत:च केला दावा, आता तोंड लपवण्याची आली वेळ
Rakesh Bedi and Ranveer Singh
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 24, 2026 | 10:43 AM

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन पाच दिवस उलटले आहेत आणि जगभरात त्याने कमाईचा 700 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. त्यातील प्रत्येक भूमिकेविषयी नेटकरी बारकाईने सर्च करत आहेत आणि त्यावरून आपापली मतं मांडत आहेत. रणवीर सिंहने साकारलेल्या हमजा अली मजारी आणि जसकीरत सिंह रंगी या भूमिकांचं तर कौतुक होतच आहे. पण त्याचसोबत आणखी एका भूमिकेनं प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलंय, ते म्हणजे जमील जमाली. जर तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला त्याचा क्लायमॅक्ससुद्धा माहीत असेलच. ‘धुरंधर 2’मध्ये हमजासोबतच अनेकांना मोठा धक्का बसतो, जेव्हा जमील जमाली हा एक भारतीय स्पाय एजंट असल्याचं दाखवलं जातं.

जमील जमाली ही या चित्रपटातील एक अशी भूमिका आहे, जो त्याच्या विनोदाच्या अचूक टाइमिंगने प्रेक्षकांना हसवतो. कोणालाच त्यावर 1 टक्काही शंका नसते. परंतु त्याच्या स्पाय एजंटच्या ट्विस्टने सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसतो. या ट्विस्टमुळे स्वत:ला खरा जमील जमाली म्हणणारा पाकिस्तानी नेता नबील गबोलसुद्धा अवाक् झाला आहे. आदित्य धरचा ‘धुरंधर 1’ जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हापासून नबील एका वेगळ्यात थाटात होता. आपल्या प्रत्येक मुलाखतीत तो दावा करत होता की जमील जमालीची भूमिका त्याच्यावर आधारित आहे. त्याने चित्रपटातील त्याच्या भूमिकेवर नाराजीसुद्धा व्यक्त केली होती. धुरंधरमध्ये माझ्या भूमिकेला विनोदी अंदाजात दाखवलं गेलंय, पण खऱ्या आयुष्यात मी अत्यंत दबंग व्यक्तिमत्त्वाचा आहे, असा दावा तो करत होता. याशिवाय चित्रपटात माझ्या कुटुंबाची चुकीची कथा दाखवल्याचाही आरोप नबीलने केला होता.

आता ‘धुरंधर : द रिव्हेंज’च्या क्लायमॅक्समध्ये मोठा ट्विस्ट आणत आदित्य धरने जमील जमालीला भारताचाच स्पाय एजंट म्हणून दाखवला आहे. या ट्विस्टनंतर आता सोशल मीडियावर नबील गबोलला जोरदार ट्रोल केलं जातंय. भारतीय चाहते त्याची अक्षरश: खिल्ली उडवत आहेत. ‘धुरंधर 2 मध्ये जमील जमालीला भारतीय स्पाय एजंट म्हणून दाखवलं आहे, जो दाऊदलाही विष देतो. मग आता नबील गबोल याचंही श्रेय घेणार का’, असा उपरोधिक सवाल एका युजरने केला. तर ‘नबील गबोल हे आता रॉ चे एजंट आहेत’, अशीही मस्करी नेटकऱ्यांनी केली.

नबील गबोलच्या दाव्यांनंतर जमील जमालीची भूमिका साकारणारे अभिनेते राकेश बेदी यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये हे स्पष्ट केलं होतं की जमील जमाली ही फक्त एका पाकिस्तानी नेत्याची कहाणी नाही. वेगवेगळ्या पाकिस्तानी नेत्यांचं निरीक्षण करून ही भूमिका बनवण्यात आली आहे. “जर नबील असा विचार करत असतील की ही भूमिका त्यांच्यावर आधारित आहे, तर त्याला मी काहीच करू शकत नाही”, असंही ते म्हणाले होते.

Follow Us