Dhurandhar 2 : प्रदर्शनाच्या काही तास आधी आदित्य धरची कळकळीची विनंती; कॅप्शनमध्ये दिली मोठी हिंट
दिग्दर्शक आदित्य धरने 'धुरंधर : द रिव्हेंज' प्रदर्शित होण्याआधीच प्रेक्षकांना खास विनंती केली आहे. त्याचसोबत कॅप्शनमध्ये त्याने ज्या गोष्टीची हिंट दिली आहे, त्याकडे नेटकऱ्यांचं सर्वाधिक लक्ष वेधलं गेलं आहे.

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा दुसरा भाग 19 मार्चपासून थिएटरमध्ये प्रदर्शित होतोय. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. ही क्रेझ पाहता थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याचे स्पॉइलर्स आणि काही सीन्स सोशल मीडियावर व्हायरल होण्याचीही मोठी शक्यता आहे. याचाच विचार करून दिग्दर्शक आदित्य धरने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित चाहत्यांना विनंती केली आहे. ही विनंती करतानाच या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने जे लिहिलं आहे, त्याकडे नेटकऱ्यांचं सर्वाधिक लक्ष वेधलं गेलं आहे.
आदित्य धरची पोस्ट-
‘5 डिसेंबर 2025 रोजी जगभरातील थिएटर्समध्ये ‘धुरंधर’ प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून तुम्ही या चित्रपटावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. या चित्रपटातील प्रत्येक लहानसहान गोष्टींचं तुम्ही कौतुक केलं, प्रत्येक सीनवर चर्चा केली, पुन्हा पुन्हा चित्रपट पाहिला आणि अशा गोष्टींचं निरीक्षण केलं, ज्या कधी कोणाच्या लक्षात येतील असा मी विचारसुद्धा केला नव्हता. या अनपेक्षित आणि अत्यंत सुंदर प्रवासात आमचा हा चित्रपट हळूहळू तुमचा झाला, त्यानंतर या देशाचा आणि त्यानंतर जगाचा झाला. एखाद्या दिग्दर्शकाला मिळणारी ही सर्वांत भावूक आणि नम्र भेट आहे. त्यामुळे जेव्हा आम्ही ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा दुसरा भाग बनवत होतो, तेव्हा एक गोष्ट निश्चित होती की, आम्हाला प्रेक्षकांना सरप्राइज द्यायचं आहे. या चित्रपटातून तुम्हाला अशा भावना जाणवून द्यायच्या आहेत, ज्याची तयारी तुम्ही केली नसेल. हे करणं अजिबात सोपं नव्हतं. पण तुमच्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे’, असं त्याने लिहिलं आहे.
या पोस्टमध्ये त्याने पुढे म्हटलंय, ‘धुरंधर: द रिव्हेंजमधील प्रत्येक ट्विस्ट, प्रत्येक भावना त्याच तीव्रतेने तुम्हाला अनुभवता यावा, यासाठी आम्ही त्यात सर्वस्व ओतलं आहे. हा अनुभव थिएटरमध्येच अनुभवला पाहिजे. त्यामुळे मी सर्वांना अत्यंत मनापासून विनंती करतो की, कृपया स्पॉइलर्स शेअर करू नका. चाहत्यांना कुतूहल आणि उत्सुकतेनं थिएटरमध्ये येऊ द्या आणि त्यांना चित्रपट पाहून काय वाटलं, त्या भावनेनं थिएटरबाहेर पडू द्या. धुरंधरला तुम्ही यशस्वी बनवलं आहे आणि आता धुरंधर 2 साठी मी तुमच्यावर विश्वास ठेवतोय.’
या पोस्टच्या कॅप्शनमध्ये आदित्यने लिहिलंय, ‘ओह आणखी एक गोष्ट.. श्रेयनामावली पूर्णपणे स्क्रोल होईपर्यंत खुर्ची सोडून जाऊ नका.’ या एका वाक्यामुळे नेटकऱ्यांनी ‘धुरंधर’च्या तिसऱ्या भागाची अखेरीस घोषणा होऊ शकते, असा अंदाज वर्तवला आहे.