तुमचे डोळे निरोगी ठेवण्यासाठी दररोज या सोप्या सवयींचे करा पालन
आजकाल अनेक लोकांना डोळ्यांच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे डोळ्यांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

डोळे हे आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहेत. ते आपल्याला आपल्या सभोवतालचे जग पाहण्यास आणि समजून घेण्यास मदत करतात. आजच्या डिजिटल युगात मोबाईल, लॅपटॉपचा अती वापर आणि टीव्हीच्या स्क्रीनकडे बराच वेळ टक लावून पाहिल्यामुळे डोळ्यांवरील ताण वाढत आहे. याव्यतिरिक्त, वाढते वय, अनहेल्दी आहार, धूळ, तीव्र सूर्यप्रकाश आणि डोळ्यांच्या योग्य देखभालीचा अभाव यांचाही डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अनेकदा लोकं डोळ्यांच्या किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे पुढील डोळ्यांच्या समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
डोळ्यांचे आरोग्य दीर्घकाळ टिकवण्यासाठी काही चांगल्या दैनंदिन सवयी अंगीकारणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त संतुलित आहार घेणे आणि डोळ्यांमधील कोणत्याही बदलांकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. डोळ्यांची योग्य काळजी वेळेवर घेतल्यास अनेक समस्यांचा धोका कमी होऊ शकतो. डोळ्यांचे आरोग्य दीर्घकाळ टिकवण्यासाठी तुम्ही कोणत्या सवयी अंगीकारल्या पाहिजेत, काय खाल्ले पाहिजे आणि कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.
डोळे निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या सवयी अंगीकारल्या पाहिजेत?
राष्ट्रीय नेत्र संस्थेनुसार (NEI) डोळे निरोगी ठेवण्यासाठी नियमित डोळ्यांची तपासणी करणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून कोणत्याही समस्या लवकर ओळखता येतील. जर तुम्ही तुमचा मोबाईल फोन, लॅपटॉप दीर्घकाळ वापरत असाल तर तुमच्या डोळ्यांना विश्रांती द्या. उन्हात बाहेर जाताना, हानिकारक अतिनील किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण करणारे सनग्लासेस वापरा.
धूम्रपान टाळा, कारण त्यामुळे डोळ्यांच्या अनेक आजारांचा धोका वाढू शकतो. जर तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असाल, तर त्या स्वच्छ करण्याच्या आणि हाताळण्याच्या योग्य पद्धतींचे पालन करा.
संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी डोळ्यांना स्पर्श करण्यापूर्वी आपले हात पूर्णपणे धुवा.
तसेच जर तुम्हाला मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असेल तर डोळ्यांच्या आरोग्यासाठी ते नियंत्रणात ठेवणे देखील महत्त्वाचे आहे.
डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा
डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या, गाजर, रताळे, संत्री, पेरू, मासे, अंडी, बदाम आणि अक्रोड यांचा समावेश करा. यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, ओमेगा-3 फॅटी ॲसिड, ल्युटीन आणि झियाझॅन्थिन यांसारखी पोषक तत्वे असतात, जी डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात.
याशिवाय पुरेसे पाणी पिणे देखील महत्त्वाचे आहे, जेणेकरून डोळ्यांतील कोरडेपणा कमी होईल आणि ते अधिक चांगल्या प्रकारे कार्य करू शकतील.
डोळ्यांच्या कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये?
तुम्हाला जर अचानक अंधुक दिसू लागल्यावर, डोळ्यांमध्ये तीव्र वेदना होत असतील तसेच डोळे सतत लाल राहत असतील किंवा त्यांना सूज आली असेल तर अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.
त्याचबरोबर प्रकाशाभोवती चमक दिसत असेल, डोळ्यांसमोर काळे ठिपके किंवा धाग्यासारख्या खुणा दिसत असतील, किंवा दृष्टी अचानक कमी झाल्याचा अनुभव येत असेल, तर याकडे दुर्लक्ष करू नये.
याव्यतिरिक्त, डोळ्यांतून सतत पाणी येणे, जळजळ होणे किंवा वारंवार संसर्ग होणे ही देखील एखाद्या समस्येची लक्षणे असू शकतात. जर तुम्हाला ही लक्षणे जाणवत असतील तर तुम्ही विनाविलंब नेत्रतज्ञांचा सल्ला घ्यावा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
