‘धुरंधर’चं कौतुक करणाऱ्यांवर भडकला अभिनेता; म्हणाला ‘लज्जास्पद, तुमचा स्वाभिमान कुठे गेला?’
'धुरंधर' या चित्रपटाचं कौतुक करणाऱ्यांवर, त्यातील भूमिकांबद्दलचे रील्स, एआय फोटो व्हायरल करणाऱ्यांवर हा अभिनेता भडकला आहे. सोशल मी़डियावर पोस्ट लिहित त्याने काही सवाल उपस्थित केले आहेत. तुमचा स्वाभिमान कुठे गेला, असं त्याने म्हटलंय.

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 600 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या चित्रपटाचं केवळ भारतातच नाही तर पाकिस्तानमध्येही कौतुक होत आहे. अर्थात अनेक पाकिस्तानी लोकांनी ‘धुरंधर’वर टीका केली आहे. परंतु त्यातील कलाकार, त्यांचं दमदार अभिनय, प्रॉडक्शन यांची प्रशंसा करणारा वर्गही तिथे आहे. यावरूनच एका पाकिस्तानी अभिनेत्याला मिरच्या झोंबल्या आहेत. सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहित त्याने पाकिस्तानी लोकांना सुनावलं आहे. या अभिनेत्याचं नाव आहे इम्रान अब्बास.
काय म्हणाला इम्रान अब्बास?
‘भारत आणि जगभरात एक चित्रपट प्रदर्शित झाला, जो उघडपणे पाकिस्तान, आपला देश, आपला धर्म आणि आपली ओळख यांच्याविरुद्ध एक कथा मांडतोय. केवळ हा चित्रपटच लज्जास्पद नाही तर पाकिस्तानमधील लोक, आपला समाज त्याचं गौरव करतोय ही वस्तुस्थिती आहे. त्यावर आधारित रील्स, एआय फोटो आणि व्हिडीओ बनवले जात आहेत. चित्रपटातील पात्र आणि कलाकारांची ते प्रशंसा करत आहेत. अभिमानाने या चित्रपटाचा प्रचार केला जातोय’, अशा शब्दांत त्याने राग व्यक्त केला.

या पोस्टमध्ये त्याने पुढे म्हटलंय, ‘होय, चित्रपट चांगला बनवला गेला असेल. निर्मितीचा दर्जाही उच्च असेल. पण हे सर्व स्वाभिमानाची जागा कशी घेऊ शकते? द्वेषाने भरलेला आणि कोणत्याही देश, राष्ट्र किंवा धर्माविरोधात बनलेल्या चित्रपटाला आपण प्रमोट करण्याची खरंच गरज आहे का? जर भारताविरुद्ध असाच चित्रपट पाकिस्तानमध्ये बनवला गेला तर संपूर्ण भारत तो अजिबात संकोच न करता नाकारेल. जे अगदी बरोबर असेल. इथे आपण अशा चित्रपटाचं कौतुक करतोय, जो आपल्यासाठी एक चपराक आहे. आपण त्याला मनोरंजन म्हणतोय. हे ओपन माईंडेड नाही तर निर्लज्जपणा आहे. यावेळी हे सिद्ध झालंय की याचा शिक्षणाशी काहीही संबंध नाही. मी सुशिक्षित लोकांना अशा अज्ञानी गोष्टी करताना पाहिलंय. शांत बसणं वाईट असू शकतं, पण उत्सव साजरा करणं त्याहूनही वाईट आहे, हे खूप लज्जास्पद आहे.’
‘धुरंधर’ या चित्रपटाचं कथानक भारत-पाकिस्तानदरम्यान असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, हेरगिरीवर आधारित आहे. यामध्ये रणवीर सिंह, संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन आणि राकेश बेदी यांच्या भूमिका आहेत.
