दीपिका कक्करच्या नणंदेच्या घरात मोठी चोरी; सोन्याची चेन, डायमंड इअररिंग्स गायब, म्हणाली- ‘माझीच चूक…’
सबाने केवळ आर्थिक नुकसान झाल्यामुळे नव्हे, तर स्वतःच्या निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची खंत व्यक्त केली आहे. घरातील मौल्यवान वस्तू अचानक गायब झाल्याचा खुलासा तिने युट्यूब व्लॉगमध्ये केला आहे.

टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर हिची नणंद आणि अभिनेता शोएब इब्राहिम याची बहीण सबा इब्राहिम सध्या एका धक्कादायक घटनेमुळे चर्चेत आली आहे. सबाच्या घरातून सोन्याची चेन आणि डायमंडचे कानातले गायब झाल्याचं समोर आलं आहे. याबाबतची माहिती सबा आणि तिचा पती सनी यांनी त्यांच्या युट्यूब व्लॉगमध्ये दिली. घरातून नेमकं सामान कसं गायब झालं, याबाबत त्यांनाही काहीच कळत नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सबा इब्राहिम सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असून, ‘सबा का जहां’ या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून ती तिच्या दैनंदिन आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करते. घरातील चोरीची माहितीही तिने व्लॉगच्या माध्यमातूनच दिली. या घटनेनंतर त्यांच्या घरातील वातावरण खराब झाल्याचं तिचा पती सनीने सांगितलं.
सनीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून घरातून वस्तू गायब होत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. सुमारे 20 ते 25 दिवसांपूर्वी सबाचे कानातले गायब झाले होते. त्यानंतर घराची साफसफाई करताना सोन्याची चेन आणि डायमंडचे ईयररिंग्सदेखील सापडले नाहीत. त्यामुळे घरातील व्यक्तींवर संशय घ्यायचा का, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. सनीने घरात सीसीटीव्ही कॅमेरे न लावल्याची खंतही व्यक्त केली. याआधी घरात वस्तू इकडे-तिकडे पडलेल्या असल्या तरी कधीही काही गायब झालं नव्हतं. त्यामुळे आतापर्यंत अशा प्रकारची चिंता करण्याचं कारण वाटलं नव्हतं, असं तो म्हणाला.
सबा इब्राहिमनेही या प्रकरणावर बोलताना स्वतःच्या निष्काळजीपणाची कबुली दिली. दागिन्यांना लॉकरमध्ये ठेवायला हवं होतं, असं तिने म्हटलं. घरातील मदतनीसांवर तिचा विश्वास असल्यामुळे दागिने सुरक्षित ठेवण्याबाबत तिने पूर्वी फारसा विचार केला नव्हता. एखादी वस्तू जमिनीवर सापडली तर ती परत दिली जायची, त्यामुळे घरात सामान ठेवताना तिला विशेष काळजी घ्यावी लागत नव्हती.
सोन्याच्या दागिन्यांव्यतिरिक्त तिचं महागडं डिजिटल घड्याळ देखील गायब झाल्याचं सबाने सांगितलं. तिची चुलत बहीण रिजाचा काही रोकड असलेला पर्सही हरवला होता. एवढंच नाही तर घरातील काही खाण्यापिण्याच्या वस्तूही कमी होत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं. सबा आणि तिचं कुटुंब सध्या आधीच काही कौटुंबिक अडचणींचा सामना करत आहे. अशात घरातून मौल्यवान वस्तू गायब झाल्याने त्यांची चिंता आणखी वाढली आहे.
