Drishyam 3: ‘दृश्यम 3’ पहायला गेले, पण थिएटरमधील प्रकार पाहून प्रेक्षकांचा संताप; कल्याणच्या मेट्रो मॉलमध्ये नेमकं काय घडलं?
‘दृश्यम 3’सारखा बहुप्रतिक्षित चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उत्साहाने तिकीट बुक केलं होतं. मात्र थिएटरमधील मूलभूत सुविधा बिघडल्याने त्यांचा अनुभव खराब झाला. आता व्हायरल व्हिडीओनंतर थिएटर व्यवस्थापनाकडून या प्रकरणावर पुढे काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागलं आहे.

Drishyam 3: कल्याणच्या INOX मेट्रो मॉलमध्ये ‘दृश्यम 3’च्या शोदरम्यान घडलेल्या प्रकारामुळे थिएटर व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. रात्रीच्या शोसाठी चित्रपट पाहायला गेलेल्या प्रेक्षकांना चित्रपटाचा थरार अनुभवण्याऐवजी थिएटरमधील असह्य उकाड्याचा सामना करावा लागला. तब्बल अडीच ते तीन तास AC बंद असल्याने प्रेक्षक अक्षरशः घामाघूम झाले. अखेर चित्रपट संपल्यानंतर संतप्त प्रेक्षकांनी थिएटर व्यवस्थापनाला जाब विचारला. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी रात्री 10.55 वाजता कल्याणमधील INOX मेट्रो मॉलमध्ये ‘दृश्यम 3’चा शो सुरू होता. मात्र शो सुरू झाल्यानंतर थिएटरमधील वातानुकूलन यंत्रणा बंद पडली. बराच वेळ उलटूनही एसी सुरू न झाल्याने थिएटरमधील तापमान वाढत गेलं. चित्रपट पाहताना अनेक प्रेक्षकांना अस्वस्थता जाणवू लागली.
प्रेक्षकांचा संताप
चित्रपट संपल्यानंतर एका प्रेक्षकाने थेट मॅनेजरशी चर्चा करत नाराजी व्यक्त केली. इतका वेळ एसी बंद असूनही प्रेक्षकांकडून पूर्ण तिकीटाचे पैसे घेण्यात आले, त्यामुळे सर्वांच्या तिकिटांचे पैसे परत करावेत, अशी मागणी त्याने केली. त्याच्या या भूमिकेला थिएटरमधील इतर प्रेक्षकांनीही पाठिंबा दिला. यावेळी केवळ एसीचा मुद्दाच उपस्थित करण्यात आला नाही, तर थिएटरमधील इतर सुविधांबाबतही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. विशेषतः लेडीज वॉशरूमच्या अस्वच्छतेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. थिएटरमध्ये तिकीटासाठी पैसे मोजल्यानंतर त्याबदल्यात योग्य सुविधा मिळणं अपेक्षित आहे, अशी भूमिका संतप्त प्रेक्षकांनी घेतली.
तिकिटाचे पैसे परत
प्रेक्षकांचा वाढता रोष पाहता अखेर थिएटर व्यवस्थापनाने सर्व प्रेक्षकांचे तिकीटाचे पैसे परत करण्याचा निर्णय घेतला. कॅशने तिकीट खरेदी केलेल्या प्रेक्षकांना जागेवरच पैसे परत करण्यात आले. तर ऑनलाइन बुकिंग केलेल्या प्रेक्षकांच्या खात्यात मंगळवारपर्यंत रिफंड जमा होईल, असं व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं. या प्रकारात जवळपास 50 ते 55 प्रेक्षकांचे रिफंड तात्काळ करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे चित्रपटाचा शो संपल्यानंतर थिएटरमध्ये काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.
दरम्यान, या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये प्रेक्षक थिएटर व्यवस्थापनाकडे आपली नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. एसी बंद असताना शो का सुरू ठेवण्यात आला, तसंच प्रेक्षकांच्या गैरसोयीची जबाबदारी कोण घेणार, असे प्रश्नही या घटनेनंतर उपस्थित होत आहेत.
