साप… विष आणि रेव्ह पार्टी… एल्विश यादव याला अटक; नंतर…
Elvish Yadav Arrest By Kota Police : रेव्ह पार्टीमुळे गोत्यात सापडलेल्या युट्यूबर एल्विश यादवला राजस्थानातील कोटा पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्याची कारही जप्त केली. अटक केल्यावर त्याची चौकशी करून पोलिसांनी त्याला सोडून दिल्याची माहिती आहे. रेव्ह पार्टीप्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

नवी दिल्ली | 4 नोव्हेंबर 2023 : रेव्ह पार्टीमुळे गोत्यात सापडलेल्या युट्यूबर एल्विश यादवला पोलिसांनी अटक केली आहे. एल्विश यादवला राजस्थानच्या कोटातील सुकेत पोलिसांनी अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एल्विशला अटक केल्याने या प्रकरणातील अनेक गोष्टी उजेडात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रेव्ह पार्टीत सापांचं विष दिल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस त्याच्या मागावर होती. अखेर त्याला अटक करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
राजस्थानच्या कोटा येथील सुकेत मधून एल्विशला अटक केल्याची माहिती आहे. अटक करत असताना बॅरेकेडिंग तोडून पळून जाण्याचा त्याने प्रयत्न केला. पण कोटा ग्रामीणच्या रामगंज सुकेत परिसरात त्याला अटक करण्यात आली आहे. एल्विशची कार कोटा पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याची चौकशी केली. त्यानंतर त्याला सोडून दिल्याचंही सूत्रांनी सांगितलं. एल्विश यादव हा प्रसिद्ध युट्यूबर आहे. तसेच बिग बॉस ओटीटी -2चा तो विजेताही आहे. नोएडा येथील एका रेव्ह पार्टीमुळे तो चर्चेत आला होता.
प्रचंड कमाई
रेव्ह पार्टीमध्ये सापांचं विष उपलब्ध करून दिल्याचा एल्विश यादववर आरोप आहेत. त्याच्यासह सहा जणांवर नोएडा सेक्टर 49 मधील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पार्ट्यांमध्ये सापाचं विष आणून देण्यासाठी एल्विश यादव प्रचंड मोठी रक्कम आकारायचा. दरम्यान, एल्विश यादवचं रेव्ह पार्टी प्रकरण उघडकीस आल्यानंतर अभिनेता सलमान खानने त्याचा बचाव केल्याचं वृत्त आहे. एल्विश यादव बिग बॉस 17च्या सेटवर दिसला होता. तसेच बिग बॉसच्या सेटवरील बोलेरो या म्युझिक व्हिडीओच्या प्रमोशनसाठी तो आला होता.
सलमानचा सल्ला
रेव्ह पार्टीत फसलेल्या एल्विशला सलमान खानने बिग बॉसच्या सेटवर सल्लाही दिला होता. जेव्हा एखादा सामान्य माणूस यशाच्या शिखरावर जातो तेव्हा लोक त्याला जळतात. हे सर्व होतच असतं. तू त्याची कधीच काळजी करू नकोस, असा सल्ला देतानाच तू यशस्वी आहेस, असं सलमान खान म्हणाला होता.
