देओल कुटुंबाचं चुकलंच, धर्मेंद्र यांच्या निधनानंतर चाहत्यांकडून संताप व्यक्त; अक्षरश: रडत म्हणाले..
ज्याप्रकारे दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची अंत्ययात्रा काढली होती, त्याचप्रकारे धर्मेंद्र यांचीसुद्धा अंत्ययात्रा काढायला पाहिजे होती, अशी भावना चाहत्यांनी व्यक्त केली आहे. धर्मेंद्र यांच्या असंख्य चाहत्यांनी देओल कुटुंबीयांवर नाराजी व्यक्त केली आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं सोमवारी (24 नोव्हेंबर) वयाच्या 89 व्या वर्षी निधन झालं. जुहू इथल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताबद्दल बराच संभ्रम होता, कारण देओल कुटुंबीयांकडून कोणतीच अधिकृत माहिती दिली जात नव्हती. जेव्हा अचानक हेमा मालिनी, ईशा देओल यांच्यापाठापोठ अमिताभ बच्चन, सलमान खान, आमिर खान असे सेलिब्रिटी विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीवर पोहोचले, तेव्हा त्यांच्या निधनाच्या वृत्तांनी अधिक जोर धरला होता. जुहू इथल्या बंगल्याबाहेर आणि स्मशानभूमीवरही कडक सुरक्षाव्यवस्था असल्याने चाहत्यांना धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप देता आला नाही. अनेकांनी स्मशानभूमीसमोर रस्त्याच्या कडेला उभं राहून जड अंत:करणाने, पाणावलेल्या डोळ्यांनी धर्मेंद्र यांना निरोप दिला. यावरून आता काहींनी देओल कुटुंबाविरोधात संताप व्यक्त केला आहे.
“धर्मेंद्र हे संपूर्ण देशभरातील चाहत्यांसाठी प्रिय होते. ज्याप्रकारे श्रीदेवी यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती आणि त्यात चाहत्यांना सहभागी होण्याची संधी मिळाली होती. त्याचप्रकारे धर्मेंद्र यांचीही अंत्ययात्रा काढायला पाहिजे होती. देओल कुटुंबीयांचं चुकलंच”, अशा शब्दांत चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी भावना व्यक्त करताना चाहत्यांचा कंठ दाटून आला होता. धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळताच लुधियानातील गावाहून काही महिला मुंबईला आल्या होत्या. गेल्या 15 दिवसांपासून त्या मुंबईतच मुक्कामाला होत्या. परंतु अखेरच्या क्षणी त्यांना पाहताही आलं नाही, याची खंत त्यांनी बोलून दाखवली.
View this post on Instagram
धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कारावेळी स्मशानभूमीवर उपस्थित राहिलेले देओल कुटुंबीयांच्या जवळचे प्रमोद कुमार आणि मनिंदर अहलुवालिया यांनी याविषयी ‘टीव्ही 9 भारतवर्ष’शी बोलताना प्रतिक्रिया दिली. या दोघांनी सांगितलं की “स्मशानभूमीत सनी देओल आणि बॉबी देओल हे धर्मेंद्र यांच्या चितेसमोरच बसून रडत होते. शाहरुख खान, गोविंदा, सलमान खान यांनी त्यांचं सांत्वन केलं. हेमा मालिनी, ईशा देओल हेसुद्धा त्यांच्या चितेजवळच होते. सनी देओलने त्यांना मुखाग्नी दिला. फुलांनी सजवलेल्या रथात धर्मेंद्र यांची अंत्ययात्रा काढायला पाहिजे होती, संपूर्ण जगाला त्यांना अखेरचा निरोप देता यायला पाहिजे होता, अशी सर्वांची इच्छा होता. परंतु असं होऊ शकलं नाही. याबाबतचा संपूर्ण निर्णय देओल कुटुंबाचा होता.”
