Govinda: कोमलसोबतच्या अफेअरवर गोविंदा स्पष्टच बोलला, संधी मिळाली तर..; सुनीताच्या आरोपांवर बेधडक उत्तर
Govinda: गोविंदाने यापूर्वी कोमलसोबतच्या नात्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांना आपली प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं होतं. कोमल ही त्याच्या आगामी चित्रपटातील सहकलाकार असून दोघेही चित्रपटाच्या निमित्ताने विविध ठिकाणी एकत्र दिसले आहेत.

Govinda: बॉलिवूडचा ‘हिरो नंबर 1’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता गोविंदा सध्या त्याच्या चित्रपटांपेक्षा खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पत्नी सुनीता आहुजा हिच्यासोबतच्या नात्यातील तणाव, घटस्फोटाच्या प्रकरणाची चर्चा आणि अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार हिच्यासोबतच्या कथित अफेअरच्या बातम्यांमुळे गोविंदा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. आता या सर्व प्रकरणांवर अभिनेत्याने आपली भूमिका मांडली असून, त्याच्या वक्तव्यामुळे मनोरंजनविश्वात चर्चांना उधाण आलं आहे. गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकार यांच्यातील जवळीक गेल्या काही काळापासून चर्चेचा विषय ठरत आहे. दोघंही आगामी ‘रूपा’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र दिसत असल्याने त्यांच्या नात्याबद्दल विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
अफेअरच्या चर्चांवर गोविंदाचं स्पष्ट उत्तर
‘एबीपी’ला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाला सुनीता हिने घटस्फोटाची याचिका मागे घेतल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने प्रतिक्रिया दिली. सुनीताने घटस्फोटाची याचिका मागे घेतली, याबद्दल त्याला विचारण्यात आलं असता त्याने त्यावर होकारार्थी उत्तर दिलं. तसंच, तिला याचिका मागे घेण्यासाठी कोणतीही भीती दाखवण्यात आली होती का, या प्रश्नावर उत्तर देताना तो म्हणाला, तो खटला तिने कसा मागे घेतला नसता.
गोविंदाला यावेळी असंही सांगण्यात आलं की, सुनीताचा आरोप आहे की, तू कोणत्या तरी रुपाच्या सौंदर्याने इतकं पछाडला गेला आहेस की तुला तुझं कुटुंब आणि घर दिसत नाही. त्यावर गोविंदा पुढे म्हणाला, माझ्याकडे मिस युनिव्हर्स प्रकारच्या चार नायिका आल्या होत्या. त्या माझ्यासोबत वेळ घालवण्यास उत्सुक होत्या. पण मी त्यांनी कधीच नीट भेटलोसुद्धा नाही. यावर आता त्यांना नीट न भेटल्याचा पश्चात्ताप होतो का, असं विचारल्यावर गोविंदाने उत्तर दिलं, “होय.. आता संधी मिळाली तर मी मागे हटणार नाही.” त्याच्या या बेधडक उत्तराची सध्या चर्चा होत आहे.
या मुलाखतीत गोविंदाने आपल्या वैवाहिक आयुष्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही भाष्य केलं. एखादी व्यक्ती दुसऱ्याचं नशीब हिरावून घेण्याचा प्रयत्न करते, तेव्हा ती त्याच्या आयुष्यातील स्त्रीला दूर करण्याचा प्रयत्न करते, अशा आशयाचं वक्तव्य त्याने केलं. तसंच, कुटुंबामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांबद्दलही त्याने नाराजी व्यक्त केली. जे लोक संसार मोडण्याचा प्रयत्न करतात, त्यांना चपलेनं मारावंसं वाटतं, अशा शब्दांत त्याने राग व्यक्त केला.
गेल्या काही महिन्यांपासून गोविंदा आणि सुनीता यांच्या वैवाहिक नात्याबद्दल सातत्याने चर्चा होत आहे. सुनीताने पतीच्या कथित अफेअरबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे या प्रकरणाला अधिक हवा मिळाली. गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्यातील तणावाची चर्चा सुरू असतानाच सुनीताने घटस्फोटाची याचिका दाखल केल्याचं वृत्त समोर आलं होतं. नंतर सुनीताने ही याचिका मागे घेतली.
