Kainchi Dham: ‘हनुमान अंश’मुळे नीम करोली बाबांच्या कैंची धाममध्ये तुफान गर्दी; दिग्दर्शकांची भाविकांना कळकळीची विनंती
Kainchi Dham: उत्तराखंडमधल्या नैनीताल इथं असलेल्या कैंची धाम याठिकाणी भाविकांची दिवसेंदिवस गर्दी वाढताना दिसत आहे. 'हनुमान अंश' या चित्रपटाच्या यशानंतर ही गर्दी वाढली आहे.

Kainchi Dham: नीम करोली बाबांच्या भक्तांसाठी प्रसिद्ध असलेल्या उत्तराखंडमधील कैंची धाममध्ये सध्या मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत आहे. ‘हनुमान अंश’ या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर या ठिकाणी भाविकांची संख्या वाढल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. गांधी जयंतीच्या लाँग वीकेंडमध्ये म्हणजेच 2 ते 4 ऑक्टोबरदरम्यान कैंची धाममध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर ‘हनुमान अंश’चे दिग्दर्शक डॉ. विशाल चतुर्वेदी यांनी भाविकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. कैंची धाम हे उत्तराखंडमधील नैनीतालजवळील प्रसिद्ध आध्यात्मिक ठिकाण आहे. नीम करोली बाबा यांच्याशी या आश्रमाचा जवळचा संबंध असून, देश-विदेशातून त्यांचे भक्त इथं दर्शनासाठी येतात. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी अचानक मोठी गर्दी झाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचेही या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
‘हनुमान अंश’ हा चित्रपट नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आणि त्यांच्या अध्यात्मिक कार्यावर आधारित आहे. चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादानंतर अनेक प्रेक्षकांमध्ये नीम करोली बाबा आणि त्यांच्या कार्याबद्दल उत्सुकता निर्माण झाल्याचं दिसत आहे. त्याचाच परिणाम म्हणून काही भाविक चित्रपट पाहिल्यानंतर कैंची धामला पोहोचल्याचा दावा सोशल मीडिया पोस्टमधून केला जात आहे.
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
या वाढत्या गर्दीची दखल घेत दिग्दर्शक विशाल चतुर्वेदी यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत भाविकांना परिस्थितीची माहिती घेऊनच कैंची धामला जाण्याची विनंती केली. गर्दी किती आहे, रांगा किती लांब आहेत आणि वाहतुकीची परिस्थिती काय आहे, याची माहिती घेऊन प्रवासाचे नियोजन करावं, असं त्यांनी सांगितलं. कैंची धाममध्ये मोठी गर्दी असल्यास भाविकांनी इतर ठिकाणांचाही विचार करावा, असंही त्यांनी सुचवलं. नीम करोली गाव, वृंदावन, हनुमान गढी, काकरीघाट आणि नीम करोली बाबांशी संबंधित इतर ठिकाणीही दर्शन घेता येईल, असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या मते, भक्ती ही केवळ एका ठिकाणी जाण्यापुरती मर्यादित नसून श्रद्धा मनात असणं अधिक महत्त्वाचं आहे.
गर्दीमुळे महिला आणि लहान मुलांना त्रास होऊ नये, याची काळजी घेण्याचं आवाहनही दिग्दर्शकांनी केलं. गर्दीत तासनतास अडकण्याची किंवा अस्वस्थ होण्याची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी भाविकांनी घाई न करता परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा, असा त्यांचा संदेश आहे. ‘हनुमान अंश’ला मिळणारा प्रतिसाद आणि त्यानंतर नीम करोली बाबांच्या ठिकाणांकडे वाढलेलं आकर्षण सध्या चर्चेचा विषय बनलं आहे. मात्र, श्रद्धास्थळी जाण्यापूर्वी गर्दी आणि वाहतुकीची स्थिती तपासूनच प्रवास करणं भाविकांसाठी अधिक सुरक्षित ठरणार आहे.
