हेमा मालिनी यांचं मोठं वक्तव्य, ‘त्यांना घरी राहणारी बायको हवी होती आणि…’

Hema Malini: 'त्यांना घरी राहणारी बायको हवी होती आणि...', वैवाहिक आयुष्याबद्दल हेमा मालिनी यांचं मोठं वक्तव्य, असं का म्हणाल्या हेमा मालिनी? हेमा मालिनी कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे असतात चर्चेत

हेमा मालिनी यांचं मोठं वक्तव्य, त्यांना घरी राहणारी बायको हवी होती आणि...
फाईल फोटो
Updated on: Oct 17, 2025 | 9:31 AM

Hema Malini: बॉलिवूडच्या ड्रीम गर्ल म्हणजे हेमा मालिनी यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडमध्ये फक्त आणि फक्त हेमा मालिनी यांचा बोलबाला होता. हेमा मालिनी यांनी फक्त सिनेविश्वातच नाही तर, राजकारणात देखील स्वतःचं नाव मोठं केलं आहे. आज हेमा मालिनी त्यांच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यात आनंदी आहेत. पण एक काळ असा होता, जेव्हा हेमा मालिनी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत होत्या. हेमा मालिनी यांच्या आयुष्यातील एक गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे. अभिनेते धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न करण्यापूर्वी हेमा मालिनी यांचं लग्न दिवंगत अभिनेते संजीव कुमार यांच्यासोबत ठरलं होतं. पण काही कारणांमुळे दोघांचं लग्न होऊ शकलं नाही.

धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न करण्यापूर्वी हेमा मालिनी आणि संजीव कुमार यांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं. दोघांच्या लग्नाची बोलणी देखील सुरु होती. पण लग्न होऊ शकलं नाही. 1991 मध्ये ‘जूनियर जी मॅगझीन’ मध्ये हेमा मालिनी यांनी संजीव यांच्यासोबत लग्न मोडण्याचं कारण सांगितलं होतं.

हेमा मालिनी यांनी सांगितलं होतं की, संजीव कुमार यांना घरात राहणारी आणि लग्नानंतर सर्वकाही त्याग करणारी बायको हवी होती… संजीव यांनी त्यांच्या आजारी आईची काळजी घेणारी आणि त्यांची साथ देणारी बायको हवी होती…, याच कारणामुळे दोघांचं लग्न झालं नाही.

सांगायचं झालं तर, 1972 मध्ये ‘सीता और गीता’ सिनेमाच्या सेटवर दोघांची लव्हस्टोरी सुरु झाली. ‘हवा के साथ साथ’ गाण्यानंतर दोघांमध्ये प्रेम बहरलं. ‘एन एक्टर्स एक्टर’ नावाच्या पुस्तकानुसार, संजीव कुमार यांच्या कुटुंबीयांनी लग्नाची बोलणी करण्यासाठी हेमा मालिनी यांच्या घरी जाण्याचा देखील निर्णय घेतला होता. दोन्ही कुटुंबियांनी मद्रास येथे भेटण्याचं ठरवलं.

संजीव कुमार यांची आई हेमा मालिनी यांच्या घरी मिठाई घेऊन पोहोचल्या होत्या. सर्वकाही ठिक होतं. पण एका अटीमुळे दोघांचं लग्न होऊ शकलं नाही. लग्नानंतर हेमा मालिनी सिनेमात काम करणार नाही… अशी संजीव कुमार आणि त्यांच्या आईची अट होती.

पण हेमा मालिनी लग्नानंतर देखील काम करतील… असं त्यांच्या आईचं म्हणणं होतं… अशात हेमा मालिनी आणि संजीव कुमार यांचं लग्न होऊ शकलं नाही. संजीव कुमार यांच्यासोबत लग्न मोडल्यानंतर हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न केलं. तर संजीव कुमार हे अविवाहित राहिले…