मला जाळलं जाईल की पुरलं जाईल? धर्मांतरासाठी बॉयफ्रेंडचा दबाव; ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा खुलासा
'बिग बॉस 13'मधली लोकप्रिय जोडी हिमांशी खुराना आणि असिम रियाज यांचं काही वर्षांपूर्वी ब्रेकअप झालं. आता नुकत्यात दिलेल्या एका मुलाखतीत तिने ब्रेकअपचं खरं कारण सांगितलं आहे. यावेळी तिने असिमबद्दल काही धक्कादायक खुलासेसुद्धा केले आहेत.

‘बिग बॉस 13’ फेम अभिनेत्री हिमांश खुरानाने तिचा एक्स बॉयफ्रेंड असिम रियाजसोबतच्या नात्याबद्दल अनेक वर्षांनंतर मोठा खुलासा केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीत हिमांशीने दावा केला की असिमच्या दबावाखाली येऊन एकेकाळी ती इस्लाममध्ये धर्मांतर करण्याच्या अत्यंत जवळ पोहोचली होती. त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना त्याने पूजा-पाठ आणि धार्मिक मान्यतांच्या बाबतीत अनेकदा आक्षेप नोंदवल्याचंही तिने सांगितलं. इतकंच नव्हे तर धर्माबद्दलचा हा मानसिक दबाव नंतर इतका वाढत गेला की एकेरात्री तिला आयुष्याचा शेवटचा दिवस असल्यासारखं वाटलं होतं. धर्मांतर करण्यापूर्वी तिने प्रियकर असिमकडे चारधाम यात्रा करण्याचीही इच्छा बोलून दाखवली होती.
बिग बॉसमध्ये झाली भेट
हिमांशी खुराना आणि असिम रियाज यांची पहिली भेट ‘बिग बॉस 13’मध्ये झाली होती. शोमध्येही दोघांमधील जवळीक चर्चेत होती आणि त्यानंतरही त्यांनी नातं पुढे नेलं. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतरही हिमांशी आणि असिम एकमेकांना डेट करू लागले. ही जोडी सोशल मीडियावरही इतकी हिट झाली की चाहत्यांनी त्यांना ‘असिमांशी’ असा टॅग दिला होता. पण या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. डिसेंबर 2023 मध्ये दोघांनी ब्रेकअप जाहीर केलं. दोघांचे धर्म आणि धार्मिक मान्यता वेगवेगळे असल्याने ब्रेकअपचा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यावेळी हिमांशीने सोशल मीडियावर असिमसोबतच्या प्रायव्हेट चॅट्सचे स्क्रीनशॉटसुद्धा शेअर केले होते, ज्यामध्ये धर्माचा उल्लेख होता.
ब्रेकअपचं कारण
आता पारस छाबडाच्या पॉडकास्ट मुलाखतीत हिमांशी म्हणाली, “रिलेशनशिपमध्ये असताना त्याने मला स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं की, आता पूजा-पाठ असं काहीच चालणार नाही. त्याच्या कुटुंबाकडून आणि त्यांच्या धार्मिक श्रद्धांचा माझ्यावर दबाव होता. हळूहळू हा दबाव इतका वाढला की मी इस्लाम धर्म स्वीकारण्याच्या अगदी जवळ पोहोचली होती. मी त्याच्या प्रेमात इतकी वेडी होते की, त्याच्यासाठी माझा धर्मसुद्धा बदलायला तयार झाली होती. धर्मांतर करण्यापूर्वी मला चारधाम यात्रा करायची होती. मी पुन्हा कधी माझ्या धर्माशी जोडली जाऊ शकणार नाही, या भीतीने मला शेवटची चारधाम यात्रा करायची होती. माझ्या मनात असेही प्रश्न उपस्थित होत होते की, निधनानंतर माझ्यावर अंत्यविधी कोणत्या पद्धतीने होतील? माझ्या पार्थिवाला मुखाग्नी दिलं जाईल की पुरलं जाईल, असा सवाल माझ्या मनात घोळत होता.”
“कोणत्याही नात्यात कोणावरही धर्म बदलण्यासाठी दबाव टाकणं योग्य नाही. माझ्या मते, प्रत्येकाला आपली धार्मिक ओळख आणि श्रद्धा जपण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. त्यावेळी मी खूप भावनिक दबावाखाली होती आणि नंतर माझ्या लक्षात आलं की धर्म बदलणं हा योग्य निर्णय ठरणार नाही”, अशा शब्दांत ती पुढे व्यक्त झाली.
