‘या’ एका कारणामुळे हृतिक रोशन-सुझानचा घटस्फोट? 10 वर्षांनंतर खुलासा

लग्नाच्या 14 वर्षांनंतर अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खानने घटस्फोट घेतला. या घटस्फोटाबद्दल दोघांनी कधीच माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली नाही. मात्र हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी एका मुलाखतीत त्यामागचं कारण सांगितलं आहे.

या एका कारणामुळे हृतिक रोशन-सुझानचा घटस्फोट? 10 वर्षांनंतर खुलासा
Hrithik Roshan And Sussanne Khan
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 04, 2025 | 8:43 AM

‘कहो ना प्यार है’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच अभिनेता हृतिक रोशन रातोरात सुपरस्टार बनला. या चित्रपटानंतर हृतिकसोबत लग्नासाठी असंख्य स्थळांची रांग लागली होती. मात्र त्यावेळी हृतिकचं मन एका तरुणीवर जडलं. या वर्षी हृतिकचा चित्रपट प्रदर्शित झाला, त्याच वर्षाच्या अखेरीस हृतिकने सुझान खानशी लग्न केलं. बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक या दोघांची जोडी होती. मात्र लग्नाच्या 14 वर्षांनंतर हृतिक आणि सुझान विभक्त झाले. 2014 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.

या दोघांच्या घटस्फोटाच्या वृत्ताने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. घटस्फोटाच्या वेळी बऱ्याच चर्चांनाही उधाण आलं होतं. हृतिकने सुझानची फसवणूक केली, अशा चर्चा होत्या. कारण काही अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडलं जात होतं. तर दुसरीकडे सुझानचं अभिनेता अर्जुन रामपालशी विवाहबाह्य संबंध असल्याने घटस्फोट झाल्याच्याही चर्चा होत्या. कारण घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुझान आणि अर्जुन रामपाल यांना एकत्र एका रेस्टॉरंटमध्ये पाहिलं गेलं. मात्र घटस्फोटामागील कारणाबद्दल हृतिक किंवा सुझान यांनी कधीच कोणती प्रतिक्रिया दिली नाही.

घटस्फोटानंतर सुझानने हृतिकके कोट्यवधी रुपयांची पोटगी मागितल्याचीही चर्चा होती. सुझानने हृतिककडे 10-20 नव्हे तर तब्बल 400 कोटी रुपयांची पोटगी मागितल्याचं म्हटलं गेलं होतं. अखेर हृतिकने तिला 380 कोटी रुपये दिले, असे वृत्त समोर आले होते. हृतिकचे वडील राकेश रोशन ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत घटस्फोटाविषयी म्हणाले, “कोर्टात घटस्फोट होताच हृतिक बाहेर पडला आणि त्याने सुझानसाठी कारचा दरवाजा उघडला होता. यावरून त्याचं व्यक्तिमत्त्व कसं आहे हे समजतं. अशा गोष्टी तुम्हाला कोणी शिकवत नाही. ते आपसूकच येतं. तो महिलांचा खूप आदर करतो. त्याच्यासारखेच रिदान आणि रेहान आहेत.”

‘युवा’ला दिलेल्या एका मुलाखतीत राकेश रोशन यांनी हृतिक-सुझानच्या घटस्फोटामागचं कारणसुद्धा सांगितलं होतं. “जे काही घडलं ते त्या दोघांमध्ये घडलं. माझ्यासाठी सुझान ही सुझानच आहे. ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांच्यात गैरसमज निर्माण झाला होता. त्यामुळे तो गैरसमजसुद्धा तेच दूर करू शकतात. आमचं सुझानसोबतचं नातं अजूनही तसंच आहे. ती आजसुद्धा आमच्या घराची एक सदस्य आहे”, असं राकेश रोशन म्हणाले. एका गैरसमजामुळे हृतिक आणि सुझान यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला, असं त्यांनी सांगितलं.