प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या घरावर हातोडा चालवू नका, भारताची बांग्लादेशला विनंती, पण ते ऐकतील का?
परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेश सरकारला सांगितलंय की हे घर म्हणजे एक ऐतिहासिक स्थळ आहे. या इमारतीचं नूतनीकरण करून संयुक्त वारसा साजरा करणाऱ्या साहित्यिक संग्रहालयात त्याचं रुपांतरित केलं जाऊ शकतं.

बंगालच्या नामांकित साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींच्या तीन पिढ्यांशी संबंधित बांगलादेशातील घर पाडलं जात आहे. त्याबद्दल भारत सरकारने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ही इमारत बांगलादेशातील मैमनसिंग शहरात स्थित प्रसिद्ध बाललेखक आणि प्रकाशक उपेंद्रकिशोर रे यांचं वडिलोपार्जित घर आहे. उपेंद्रकिशोर हे कवी सुकुमार रे यांचे वडील आणि दिग्गज चित्रपट निर्माते सत्यजित रे यांचे आजोबा होते. ही मालमत्ता सध्या बांगलादेश सरकारच्या मालकीची आहे. मंगळवारी भारताने बांगलादेशला इमारत पाडण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचं आवाहन केलं.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) बांगलादेश सरकारला सांगितलं की हे घर बंगाली सांस्कृतिक पुनर्जागरणाशी संबंधित एक ऐतिहासिक स्थळ आहे. या इमारतीचं नूतनीकरण करून त्याचं संयुक्त वारसा साजरा करणाऱ्या साहित्यिक संग्रहालयात रुपांतरित केलं जाऊ शकतं. परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेश सरकारला असंही सांगितलंय की त्यांनी या इमारतीच्या जीर्णोद्धाराचा विचार केला तर भारत सरकार त्यांना मदत करण्यासही तयार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही चिंता व्यक्त केली आणि आठवणींनी भरलेली जागा उद्ध्वस्त करण हृदयद्रावक असल्याचं म्हटलंय. त्यांनी बांगलादेश आणि भारताच्या सरकारांना या ऐतिहासिक स्थळाचं जतन करण्यासाठी पाऊल उचलण्याचं आवाहन केलं. सत्यजित रे यांच्या कुटुंबाला त्यांनी बंगालच्या सांस्कृतिक वारशाचे प्रणेते म्हणून वर्णन केलं.

सत्यजित रे हे जागतिक चित्रपटसृष्टीतील महान चित्रपट निर्मात्यांपैकी एक मानले जातात. निर्माते असण्यासोबतच ते लेखक, संगीतकार आणि चित्रकारदेखील होते. सत्यजित रे यांचं बांगलादेशातील वडिलोपार्जितत घर सुमारे 100 वर्षांपूर्वी त्यांचे आजोबा उपेंद्रकिशोर रे यांनी बांधलं होतं. 1947 मध्ये भारताच्या फाळणीनंतर ही मालमत्ता पाकिस्तानच्या ताब्यात गेली होती. 1971 च्या भारतासोबतच्या युद्धात पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर बांगलादेशच्या रुपात एक नवीन देश बनला.
हे घर जीर्ण अवस्थेत होतं आणि जवळपास एक दशकापासून ते वापरात नव्हतं. पूर्वी त्यात मैमनसिंग शिशु अकादमी होती, पण नंतर त्या घराला बेवारसपणे सोडून देण्यात आलं होतं . एका बांगलादेशी अधिकाऱ्याने स्थानिक माध्यमांना सांगितलं की, नवीन योजनेत शिशु अकादमीचं कामकाज पुन्हा सुरू करण्यासाठी त्याठिकाणी एक नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी जुनी इमारत पाडावी लागेल.
