पुलवामा हल्ल्यावरील सिनेमात इशान खट्टरची मुख्य भूमिका?  

पुलवामा हल्ल्यावरील सिनेमात इशान खट्टरची मुख्य भूमिका?  

मुंबई : ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या सिनेमानंतर आता पुलवामा हल्ल्यावरही सिनेमा येणार आहे. संपूर्ण देशाला हादरवून सोडलेल्या या भ्याड हल्ल्याचा थरार आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या सिनेमात ‘धडक’ फेम इशान खट्टर याची मुख्य भूमिका असू शकते. लवकरच या सिनेमाच्या कलाकारांची अधिकृत घोषणा होणार आहे.

हा सिनेमा प्रसिद्ध दिग्दर्शक अभिषेक कपूर यांच्या दिग्दर्शनात तयार होणार आहे. अभिषेक कपूर यांनी गेल्यावर्षी सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूत यांची मुख्य भूमिका असलेला ‘केदारनाथ’ हा सिनेमा बनवला होता. 2013 मध्ये भारताच्या केदारनाथमध्ये आलेला जलप्रलय अभिषेक यांनी अतिशय यशस्वीरित्या पडद्यावर उतरवला.

सिनेसृष्टीत ‘बियॉन्ड द क्लाउड’ या सिनेमातून पदार्पण करणारा इशान या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसू शकतो. तर यापूर्वी इशान हा जान्हवी कपूरसोबत मराठी सिनेमा ‘सैराट’चा रिमेक ‘धडक’मध्ये दिसला होता. या सिनेमात तो मुख्य भूमिकेत होता.

पुलवामा हल्ला :

14 फेब्रुवारीला श्रीनगर-जम्मू हायवेवर अवंतीपोरा भागात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी हायवेवर गाडीमध्ये आयईडी (Improvised Explosive Device) स्फोटकं भरुन त्यात हा स्फोट घडवून आणला. सीआरपीएफच्या वाहनामध्येही आयईडी ब्लास्ट करण्यात आला होता. यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते.

Published On - 3:48 pm, Wed, 20 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI