मी पत्नीसोबत हनिमूनला जात होतो, लोक माझ्यावरच उलटले..; अटकेनंतर काय म्हणाला जय दुधाणे?
Jay Dudhane Arrested : अभिनेता, मॉडेल जय दुधाणे याने अटकेनंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई विमानतळावरून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पाच कोटी रुपयांच्या फसवणुकीचा त्याच्यावर आरोप आहे. याबद्दल तो काय म्हणाला, ते वाचा..

मयुरेश जाधव, प्रतिनिधी: ‘बिग बॉस मराठी 3’चा उपविजेता जय दुधाणेला मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली. पाच कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात त्याला अटक झाल्याचं कळतंय. याप्रकरणी आता जयची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच जय दुधाणेचं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्षला पाटीलशी लग्न झालं होतं. त्यानंतर तो पत्नीसोबत हनिमूनला जात होता. त्याआधीच एअरपोर्टवर पोलिसांनी त्याला रोखलं. जयसोबत त्याच्या संपूर्ण कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु मी कुठेही पळून जात नाहीये, मी या सर्व गोष्टींना हिंमतीने सामोरं जाणार आहे, असं जय म्हणाला.
जय दुधाणेची पहिली प्रतिक्रिया?
“वडिलांची जबाबदारी घेतली, पण लोक माझ्यावरच उलटले आहेत. सत्य लवकरच समोर येईल. मी कुठे पळून गेलो नाही. जे आहे त्याला सामोरं जाणार. पोलिसांनी सर्वांवर गुन्हे दाखल केले आहेत. माझ्या आजी-आजोबांनाही सोडलं नाही. गाळा विकल्यावरून ही अफवा कोण पसरवत आहे, तेच समजत नाही. तसं काही असेल तर तुम्ही सिद्ध करून दाखवा. हा खोटा गुन्हा आहे आणि मी माझा चेहरादेखील लपवलं नाही. सत्य लवकरच समोर येईल. माझ्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आयुष्यात अशा अनेक अडचणी आपल्यासमोर येतात, त्यांना सामोरं जाण्याची हिंमतदेखील असली पाहिजे आणि ती माझ्यात आहे”, अशी प्रतिक्रिया जयने दिली.
View this post on Instagram
याविषयी तो पुढे म्हणाला, “मी माझ्या हनिमूनसाठी जात होतो. मी, माझी बायको, माझा भाऊ आणि त्याची बायको असे चौघेजण परदेशात जात होतो. माझ्या नावाचं अटक पत्र आहे हे मलाच माहिती नव्हतं. पोलिसांनी मला सांगितलं की तुम्ही देश सोडून जाऊ शकत नाही. त्यामुळे मी पोलिसांना सामोरं जाणार आहे.”
जयने बनावट कागदपत्रे तयार करून काही दुकानं बेकायदेशीरपणे व्यक्तींना विकल्याचा आरोप आहे. यामुळे अनेक खरेदीदारांचं आर्थिक नुकसान झालं आहे. या प्रकरणात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये जय दुधाणे, त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह त्याचे आजोबा, आजी, आई आणि बहीण यांची चौकशी केली जात आहे.
